ICAI CA Final Exam 2025 Postponed
सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चार्टर्ड अकाउंटंट्सच्या (सीए) अंतिम परीक्षांचे उर्वरित पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. याबाबत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया - ICAI ने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे आहे की, "सध्याची तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, सीए फायनल, इंटरमीडिएट आणि PQC परीक्षेचे इंटरनॅशनल टॅक्सेशन-असेसमेंट टेस्ट (INTT AT) चे ९ मे ते १४ मे २०२५ दरम्यान होणारे उर्वरित पेपर्स पुढे ढकलण्यात आले आहेत."
या परीक्षा ९ ते १४ मे दरम्यान होणार होत्या. परीक्षांच्या नवीन तारखा योग्यवेळी जाहीर केल्या जातील, असे आयसीएआयने परीक्षा पुढे ढकलल्या असल्याचे जाहीर करताना सांगितले. उमेदवारांना परीक्षेबाबत अपडेट्स पाहण्यासाठी संस्थेची वेबसाइट icai.org वर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आयसीएआय सीए फायनल आणि इंटर परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, सीए फायनल Group I ची परीक्षा २, ४ आणि ६ मे रोजी होणार होती. तर Group II ची परीक्षा ८, १० आणि १३ मे रोजी घेण्यात येणार होती. सीए इंटरमिजिएट Group I ची परीक्षा ३, ५ आणि ७ मे रोजी झाली. ९, ११ आणि १४ मे रोजी होणाऱ्या Group II च्या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
ICAI CA मे २०२५ च्या अंतिम परीक्षेचा पेपर - ६ आणि इंटरनॅशनल टॅक्सेशन- असेटसमेंट चाचणीचे सर्व पेपर चार तासांचे आहेत. तर, आयसीएआय सीए फाउंडेशन कोर्सच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत. आयसीएआय सीए मे २०२५ च्या अंतिम परीक्षा १५, १७, १९ आणि २१ मे रोजी होतील.
मे २०२५ च्या परीक्षा परदेशांतील ९ शहरांत घेतल्या जात आहेत. त्यात अबू धाबी, बहरीन, थिंपू (भूतान), दोहा, दुबई, काठमांडू (नेपाळ), कुवेत, मस्कत आणि रियाध (सौदी अरेबिया) यांचा समावेश आहे.
फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षांच्या उमेदवारांना उत्तरांसाठी इंग्रजी अथवा हिंदी माध्यम निवडण्याचा पर्याय आहे. तर, पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स - इंटरनॅशनल टॅक्सेशन - असेसमेंट टेस्ट (INTT - AT) परीक्षांसाठी माध्यम केवळ इंग्रजीच असणार आहे.