पुढारी ऑनलाईन डेस्क
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (The Institute of Chartered Accountants of India) CA फायनल आणि इंटर परीक्षेचा निकाल (ICAI CA final result 2024) आज गुरुवारी (दि.११) जाहीर केला. सीए फायनल परीक्षेत देशात दिल्लीचा शिवम मिश्रा टॉपर ठरला आहे. त्याने ८३.३३ टक्के गुण मिळवले आहेत. दिल्लीच्या वर्षा अरोराने ८० टक्के गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. मुंबईची किरण राजेंद्र सिंह आणि घिलमन सलीम अन्सारी यांनी संयुक्त तिसरा क्रमांक मिळवला आहे. दोघांना ७९.५० टक्के गुण मिळवले आहेत.
ICAI CA ची इंटर परीक्षा ३, ५ आणि ९ मे २०२४ रोजी घेण्यात आली होती आणि ग्रुप २ ची परीक्षा ११, १५ आणि १७ मे २०२४ रोजी घेण्यात आली होती. CA अंतिम ग्रुप १ च्या परीक्षा २,४ आणि ८ मे रोजी घेण्यात आल्या होत्या. ग्रुपर २ ची परीक्षा १०, १४ आणि १६ मे २०२४ रोजी घेण्यात आली. तर इंटरनॅशनल टॅक्सेशन असेसमेंट चाचणी १४ आणि १६ मे २०२४ रोजी घेण्यात आली होती.
CA इंटरमीडिएट परीक्षेत भिवडीचा कुशाग्र रॉय देशात टॉपर ठरला आहे. त्याने ८९.६७ टक्के गुण मिळवले आहेत. तर अकोल्याचा युग सचिन करिया आणि भाईंदरचा याग्य ललित चांडक या दोघांनी ८७.६७ टक्के गुणांसह संयुक्तरित्या दुसरा क्रमांक मिळवला आहे. नवी दिल्लीचा मनित सिंग भाटिया आणि मुंबईच्या हिरेश काशीरामका यांनी ८६.५० टक्के गुणांसह देशात तिसरे स्थान मिळवले आहे.
चार्टर्ड अकाउंटंट्स फायनल आणि इंटरमिडिएट परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती; ते अधिकृत वेबसाइट https://icai.nic.in/caresult/ वर त्यांचे निकाल पाहू शकतात. निकालाचा तपशील icai.org वरदेखील पाहता येईल. सीए निकाल तपासण्यासाठी संबंधित उमेदवारांना त्यांचा रोल नंबर आणि नोंदणी क्रमांक आवश्यक आहे.