राष्ट्रीय

IAS Sanjeev Khirwar स्टेडियममध्ये कुत्रा फिरवल्याने गोत्यात आलेल्या आयुक्तांचं 'ग्रँड कमबॅक', कुठे लागली वर्णी?

मे २०२२ मध्ये संजीव खिरवार दिल्लीचे महसूल आयुक्त असताना एक धक्कादायक वास्तव समोर आले होते.

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : प्रशासकीय वर्तुळात कधी कोणाचे नशीब कसे उघडेल, याचा नेम नाही. दोन वर्षांपूर्वी ज्या 'त्यागराज स्टेडियम'मधील 'डॉग वॉक' प्रकरणाने देशभर आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या विशेषाधिकारांवरून वादळ उठवले होते, त्या प्रकरणातील मुख्य केंद्रबिंदू असलेले १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी संजीव खिरवार पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्य प्रवाहात परतले आहेत. केंद्र सरकारने त्यांची नियुक्ती दिल्ली महानगरपालिकेच्या (MCD) आयुक्तपदी केली असून गृह मंत्रालयाने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.

काय होते 'डॉग वॉक' प्रकरण?

मे २०२२ मध्ये संजीव खिरवार दिल्लीचे महसूल आयुक्त असताना एक धक्कादायक वास्तव समोर आले होते. दिल्लीतील सरकारी त्यागराज स्टेडियममध्ये सराव करणाऱ्या धावपटू आणि प्रशिक्षकांना संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच सराव करण्याची परवानगी दिली जात होती. याचे कारण असे होते की, त्यानंतर हे अधिकारी महोदय आपल्या पाळीव कुत्र्याला तिथे फिरवण्यासाठी येत असत. खेळाडूंच्या हक्काच्या सरावाच्या वेळेवर गदा आणून चालवलेल्या या 'डॉग वॉक'चे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

या प्रकरणामुळे नोकरशाहीतील 'व्हीआयपी संस्कृती'वर टीका झाली. केंद्र सरकारने तातडीने कारवाई करत खिरवार यांची लडाखला तर त्यांच्या पत्नी रिंकू धुग्गा यांची अरुणाचल प्रदेशमध्ये बदली केली होती. पुढे जाऊन रिंकू धुग्गा यांना प्रशासकीय सेवेतून अनिवार्य सेवानिवृत्ती देण्यात आली होती.

नवी आव्हाने

सुमारे साडेतीन वर्षांच्या 'वनवासा'नंतर खिरवार आता दिल्लीच्या सर्वात महत्त्वाच्या प्रशासकीय पदांपैकी एक असलेल्या MCD आयुक्तपदाची धुरा सांभाळतील. १९९२ बॅचचे अधिकारी अश्वनी कुमार यांची जागा ते घेणार आहेत. खिरवार यांचे हे पुनरागमन साधेसुधे नाही, कारण त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे.

बजेटची कसोटी, आर्थिक चणचण

या महिनाअखेरीस महापालिकेचे बजेट सादर करायचे आहे. महापालिकेची डबघाईला आलेली आर्थिक स्थिती आणि कर्मचाऱ्यांचे वेतन हा मोठा प्रश्न आहे. तसेच दिल्लीतील कचरा कोंडी आणि पायाभूत सुविधांचा विकास हे देखील त्यांचे प्राधान्य असेल.

तज्ज्ञ अधिकारी पण वादाचे वलय

संजीव खिरवार हे तांत्रिकदृष्ट्या अतिशय सक्षम अधिकारी मानले जातात. त्यांनी कॉम्प्युटर इंजिनीअरिंग (B.Tech) आणि अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. दिल्लीत यापूर्वी महसूल, पर्यावरण आणि व्यापार-कर अशा महत्त्वाच्या विभागांमध्ये त्यांनी काम केले आहे. मात्र, त्यांच्या या नियुक्तीमुळे आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की, 'वादग्रस्त' ठरलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा तितक्याच ताकदीची पदे देणे कितपत योग्य आहे?

आता प्रत्येक पाऊल 'स्कॅनर'खाली

२०२२ च्या वादानंतर दिल्ली सरकारने सर्व स्टेडियम खेळाडूंसाठी रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता खिरवार जेव्हा आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतील, तेव्हा त्यांच्या प्रत्येक निर्णयाकडे आणि हालचालीकडे दिल्लीकरांचे आणि माध्यमांचे बारीक लक्ष असेल. त्यांच्या अनुभवाचा फायदा दिल्लीला मिळतो की जुन्या वादाची सावली त्यांच्या कामावर पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT