चंदीगड; वृत्तसंस्था : हरियाणात आयडीएफसी बँकेच्या सुमारे ५०४ कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोठी कारवाई करत वरिष्ठ आयएएस अधिकारी पंकज अग्रवाल यांना अटक केली आहे. हरियाणा स्कूल शिक्षा परियोजना परिषद आणि हरियाणा स्टेट ॲग्रीकल्चर मार्केटिंग बोर्ड यांच्या खात्यांमधून सरकारी निधीचा अपहार केल्याच्या आरोपांशी त्यांचा संबंध असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात अटक होणारे अग्रवाल हे दुसरे आयएएस अधिकारी असून यापूर्वी आयएएस अधिकारी रामकुमार सिंग यांना अटक झाली होती. या प्रकरणात एकूण आठ आयएएस अधिकारी तपासाच्या कक्षेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये पंकज अग्रवाल आणि रामकुमार सिंग यांच्याशिवाय मोहम्मद शायन, मणिराम शर्मा, प्रदीप कुमार, विनीत गर्ग, साकेत कुमार आणि डी. के. बेहेरा यांचा समावेश आहे. अग्रवाल यांच्या कार्यकाळात हरियाणा स्टेट ॲग्रीकल्चर मार्केटिंग बोर्डाच्या खात्यातून सुमारे १० कोटी रुपये बेकायदेशीरपणे वळवण्यात आले. हे खाते चंदीगडमधील आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या सेक्टर-३२ शाखेत ॲग्रीकल्चर मार्केटिंग डेव्हल्पमेंट फंड या नावाने चालवले जात होते. सरकारी निधी लाटण्यासाठी दोन शेल कंपन्या तयार केल्या होत्या. हरियाणा स्कूल शिक्षा परियोजना परिषदेतून ५० कोटी रुपयांहून अधिक निधी अपहार करण्यात आला.
जणांविरोधात आरोपपत्र
हरियाणा सरकारच्या विनंतीनंतर सीबीआयने हा तपास राज्य दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी ब्यूरोकडून ताब्यात घेतला होता. आतापर्यंत या प्रकरणात १७ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेचे ६ अधिकारी, हरियाणा सरकारचे ३ अधिकारी, दोन कंपन्या आणि ६ खासगी व्यक्तींचा समावेश आहे.