Rahul Gandhi on 1984 Riot
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या ब्राउन विद्यापीठातील वॉटसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स येथे दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या संवाद सत्रात, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 1984 च्या शीखविरोधी दंगली संदर्भात रोखठोक प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, "अनेक चुका ज्या काळात घडल्या, जेव्हा मी तिथे नव्हतो, पण तरीही काँग्रेस पक्षाने इतिहासात केलेल्या प्रत्येक चुकीची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे."
या सत्रात एका शीख युवकाने राहुल गांधींच्या आधीच्या विधानाचा संदर्भ घेत विचारलं की, "तुम्ही म्हणता की भारतात शीख व्यक्तींना तुरबण घालण्याची किंवा गुरुद्वाऱ्यात जाण्याची मुभा असावी. पण आमचं मागणं इतकंच मर्यादित नाही – आम्हाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हवंय, जे काँग्रेसच्या काळात नाकारलं गेलं."
1984 च्या दंगलीप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले माजी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचा उल्लेख करत तो म्हणाला, अजूनही असे अनेक सज्जन कुमार काँग्रेसमध्ये बसले आहेत. तुम्ही आम्हाला BJP चे भय दाखवता, पण स्वतः शीख समाजाशी संवाद साधण्याचा प्रयत्न का करत नाही? जर हेच सुरू राहिलं, तर पंजाबमध्ये BJP ला मोकळं मैदान मिळेल."
राहुल गांधींनी उत्तर देताना स्पष्ट केलं की, "मी असं मानत नाही की शीख समाजाला काही गोष्टींचं भय आहे. माझं विधान हे होतं की, भारतात लोकांना आपला धर्म मानताना अडचण का वाटावी? 1980 च्या दशकात जे काही घडलं, ते चुकीचं होतं.
मी हे सार्वजनिकरित्या आधीही मान्य केलं आहे. मी अनेक वेळा सुवर्ण मंदिरात गेलो आहे आणि भारतातील शीख समुदायाशी माझे चांगले संबंध आहेत."
अनेक चुका ज्या काळात घडल्या, जेव्हा मी तिथे नव्हतो, पण तरीही काँग्रेस पक्षाने इतिहासात केलेल्या प्रत्येक चुकीची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे."
1980 च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमधील फुटीरतावादी चळवळीला दडपण्यासाठी 1 जून ते 10 जून 1984 या काळात ऑपरेशन ब्लू स्टार राबवण्यात आले.
जर्नेल सिंह भिंद्रनवाले आणि इतर दहशतवाद्यांनी अमृतसरच्या गोल्डन टेम्पलमध्ये आश्रय घेतला होता. तेथेच भारतीय लष्कराने कारवाई केली.
या कारवाईत अकाल तख्तचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, ज्यामुळे शीख समुदायात तीव्र नाराजी निर्माण झाली. या घटनेनंतर काही महिन्यांनी 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली.
त्यानंतर देशभरात शीखांविरोधात हिंसाचार उसळला. सरकारी आकडेवारीनुसार, दिल्लीसह इतर ठिकाणी 3000 पेक्षा अधिक शीखांची हत्या झाली.
दरम्यान, या प्रश्नाचा व्हिडिओ भाजप नेते अमित मालवीय यांनी शेअर केला आहे. "राहुल गांधी यांना आता भारतातच नव्हे, तर विदेशातही त्यांच्या खोट्या आणि भय निर्माण करणाऱ्या प्रचारासाठी तोंड द्यावं लागतं आहे." अशी टीका त्यांनी कॅप्शनमधून केली आहे.