नवी दिल्ली : सत्य निकेतन येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीजवळ रात्री उशिरापर्यंत एनडीआरएफ आणि अग्निशामक दलानेे बचाव कार्य राबवले. pudhari
राष्ट्रीय

Delhi Hostel Building Collapse | खोदकामामुळे पाणी साचले, पाया कमकुवत झाला अन्

मला वाटलं, भूकंप झाला... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आप बीती

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मला वाटले की भूकंप आला आणि मी घराबाहेर पळत आलो. पाहतो तो डोळ्यादेखत अख्खी इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी खाली कोसळली. आम्ही धावतच तिथे गेलो. हातानं मिळेल त्या साधनाचा वापर करून ढिगारा उपसू लागलो... प्रत्यक्षदर्शी विद्यार्थी थरथरतच अनुभव कथन करत होते. दक्षिण-पश्चिम दिल्लीतील सत्यनिकेतन भागात रविवारी दुपारी एका पाचमजली इमारतीचा अचानक डोलारा कोसळून भीषण दुर्घटना घडली.

दिल्ली पोलिसात कार्यरत असलेले स्थानिक रहिवासी राजन छेत्री यांनी सांगितले की, या इमारतीत सुमारे १५ खोल्या होत्या आणि प्रत्येक खोलीत २ ते ३ विद्यार्थी राहात होते. बहुतांश विद्यार्थी केरळ, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील आहेत. या इमारतीच्या तळघरात काही दिवसांपासून दुरुस्ती व खोदकाम सुरू होते, त्यात पाणी साचल्याने पाया अत्यंत कमकुवत झाला होता. दुपारी १.३० च्या सुमारास अचानक मोठा आवाज झाला आणि जमीन हादरली.

परिसरातील एका रहिवाशाने सांगितले, आम्हाला घरामध्ये तीव्र धक्का जाणवला, जणू काही मोठा भूकंपच झाला. आम्ही घाबरून बाहेर पळालो, तेव्हा शेजारची संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाल्याचे दिसले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ८ गाड्या आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परंतु, मदत येण्यापूर्वीच स्थानिकांनी सिमेंटचे स्लॅब व विटा हटवून बचावकार्य सुरू केले होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, त्याचा पुतण्या इमारतीसमोरून दुचाकीवरून निघून गेल्यावर अवघ्या काही सेकंदांतच इमारत पत्त्यासारखी कोसळली.

‘होस्टेल डेज’ नावाच्या या इमारतीत खासगी पेईंग गेस्ट (पीजी) चालवले जात होते. मोतीलाल नेहरू कॉलेज, आत्माराम सनातन धर्म कॉलेज आणि श्री व्यंकटेश्वर कॉलेजमधील अनेक विद्यार्थी येथे वास्तव्यास होते. रविवार असल्यामुळे बहुतांश विद्यार्थी वसतिगृहात विश्रांती घेत असतानाच ही दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. नड्डा यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शक्य ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले. तसेच एम्स संचालक आणि केंद्र सरकारच्या रुग्णालयांना जखमींना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत व उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयाने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT