दिल्‍ली येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी Image Source X
राष्ट्रीय

'स्वतःसाठी शीशमहल बांधू शकलो असतो, मात्र गरिबांना कायमस्वरूपी घरे देण्याचे स्वप्न होते'

Delhi Assembly Election | पंतप्रधान मोदी यांचा केजरीवालांना टोला, दिल्लीत विकासकामांचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : मी शीशमहल बांधू शकलो असतो. मात्र, गरीब कुटुंबांसाठी कायमस्वरुपी घरे बांधण्याचे स्वप्न होते. १० वर्षांत ४ कोटी गरीब कुटुंबाना कायमस्वरुपी घरे दिली. पण स्वतःचे घर कधीच बांधले नाही, अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर केली. शुक्रवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत ४ हजार ५०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी दिल्लीतील अशोक विहारमध्ये ईडब्ल्यूएस लाभधारकांसाठी बांधलेल्या १ हजार ६७५ फ्लॅटचे उद्घाटन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाची पायाभरणी यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली.

कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि २०२५ हे वर्ष भारताच्या विकासासाठी संधींचे वर्ष असेल, असे म्हणाले. आज उद्घाटन करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये गरिबांसाठी घरे, शाळा आणि महाविद्यालयांशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. झोपडीच्या जागी पक्की घरे आणि भाड्याच्या घरांच्या जागी स्वतःची घरे, याचा अर्थ एक नवीन सुरुवात आहे, असे ते म्हणाले. ही घरे स्वाभिमान, आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतीक आहेत, असे ते म्हणाले.

‘१० वर्षांत ४ कोटींहून अधिक घरांचे स्वप्न पूर्ण केले’

विकसित भारतातील प्रत्येक नागरिकाला पक्के घर असावे यासाठी आम्ही एका संकल्पाने काम करत आहोत. यामध्ये दिल्लीचा मोठा वाटा आहे. केंद्र सरकारने झोपडीच्या जागी पक्की घरे देण्याची योजना सुरू केली आहे, असे ते म्हणाले. "स्वाभिमान अपार्टमेंटमुळे लोकांचा स्वाभिमान आणखी वाढेल," असेही ते म्हणाले. गेल्या १० वर्षांत सरकारने ४ कोटींहून अधिक लोकांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. सध्या झोपडीत राहणाऱ्या सर्वांना सर्व मूलभूत सुविधांसह घर नक्कीच मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी दिल्लीत जवळपास ३ हजार नवीन घरे बांधण्याची घोषणा केली. येत्या वर्षभरात शहरातील रहिवाशांसाठी हजारो नवीन घरे उपलब्ध करून दिली जातील, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. केंद्र सरकार नरेला उपशहराच्या बांधकामाला गती देऊन दिल्लीच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देत आहे, असे ते म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने महाविद्यालय

दिल्लीतील तरुणांना उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज, नवीन कॅम्पसची पायाभरणी करण्यात आली आहे, ज्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना दरवर्षी दिल्ली विद्यापीठामध्ये शिक्षण घेता येईल. बहुप्रतिक्षित ईस्टर्न आणि वेस्टर्न कॅम्पस आता अनुक्रमे सूरजमल विहार आणि द्वारका येथे विकसित केले जातील. याशिवाय नजफगढमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने नवीन महाविद्यालयही बांधले जाणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. एकीकडे केंद्र सरकार दिल्लीतील शिक्षण व्यवस्थेसाठी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे राज्य सरकार खोटे बोलत आहे, असे ते म्हणाले. केंद्र सरकार दिल्लीतील रस्ते, मेट्रो यंत्रणा, रुग्णालये आणि कॉलेज कॅम्पस यासारखे मोठे प्रकल्प हाताळत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

‘’आप-दा जाएगी, भाजपा आएगी’’ दिल्लीसाठी पंतप्रधान मोदींचा नवा नारा

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा नारा दिला आहे. “आप-दा जाएगी, भाजपा आएगी”, असा नारा त्यांनी दिला आहे. आम आदमी पक्षाच्या सरकारची तुलना त्यांनी ‘आप-दा’ अर्थात आपत्ती सोबत केली आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT