Hyderabad School Principal murder case  Pudhari
राष्ट्रीय

Crime News : २७ वेळा चाकूने भोसकून मुख्याध्यापिकेची हत्या ; 'बाबू' शब्दाने उघड केले १० वीच्या विद्यार्थ्यांचे भयंकर कृत्य!

शाळेची फी लुटण्याच्या उद्देशाने कृत्य; पोलिसांकडून काही दिवसांत गुन्ह्याचे गूढ उकलले

पुढारी वृत्तसेवा

Hyderabad School Principal murder case : तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापिका रूपा रेड्डी यांच्या हत्येप्रकरणाचा पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे. या प्रकरणी शाळेतील इयत्ता १० वीच्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चोरी करताना पकडले गेल्याच्या भीतीपोटी या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिकेवर तब्बल २७ वेळा चाकूने वार करून त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

फोन कॉलवरील शेवटचा शब्द आणि पोलीस तपासाची दिशाच बदलली

११ ऑगस्ट रोजी घरात कोणीही नसताना रूपा रेड्डी यांची हत्या झाली होती. या तपासात त्यांच्या अंतिम फोन कॉलवरील त्यांनी उच्चारलेल्या अखेरच्या शब्दाने पोलीस तपासाची दिशाच बदलली. फोन बंद होण्यापूर्वी रूपा यांनी आपल्या मावशीशी बोलताना 'बाबू' असा उल्लेख केला होता. तेलंगणात 'बाबू' हा शब्द विद्यार्थ्यांना किंवा लहान मुलांना संबोधण्यासाठी वापरला जातो. या एकाच शब्दावरून पोलिसांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या दिशेने तपासाची चक्रे फिरवली.

'त्या' विद्यार्थ्यांनी दारूच्या पार्ट्यांवर पैसे उधळले

रूपा रेड्डी यांची हत्या झाल्यानंतर शाळेतील दोन विद्यार्थी अचानक दारूच्या पार्ट्यांवर आणि मित्रांवर मोठ्या प्रमाणावर पैसे उधळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संशय बळावल्याने पोलिसांनी बुधवारी (दि. १९ ऑगस्ट) सकाळी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

पैशांवर रक्ताचे डाग सापडल्‍याने ठोस पुरावाच हाती

एका विद्यार्थ्याकडून पोलिसांनी १.५१ लाख रुपयांची रोकड आणि एक आयफोन हस्तगत केला. हे पैसे पालकांनी दिल्याचे उसने सांगितले असले तरी, फॉरेन्सिक तपासणीत नोटांवर मानवी रक्ताचे डाग आढळून आले. त्यामुळे पोलिसांना ठोस पुरावाच मिळाला.

रूपा यांनी आरोपी विद्यार्थ्याची हॉस्टेलमधून केली होती हकालपट्टी

आरोपी विद्यार्थ्याला काही दिवसांपूर्वी शाळेत मोबाईल आणि रोख रक्कम आणल्याबद्दल रूपा रेड्डी यांनी खडसावले होते. तसेच त्याला हॉस्टेलमधून काढून टाकले होते. ११ ऑगस्टला शाळेत फी जमा होणार असल्याने मॅडमच्या घरी मोठी रक्कम असेल, असा अंदाज बांधून या विद्यार्थ्यांनी ५ दिवसांपूर्वीच हत्येचा आणि चोरीचा कट रचला होता.

हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी एका विद्यार्थ्याने भिंत ओलांडून घरात प्रवेश केला, तर दुसरा बाहेर पाळत ठेवून होता. घरात चोरी करताना रूपा रेड्डी यांनी त्याला पाहिले. ओळख उघड होण्याच्या भीतीने त्याने रूपा यांच्यावर चाकूने २७ वार केले. सुमारे २.५ लाख रुपये घेऊन पळ काढला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने रक्ताने माखलेले कपडे नाल्यात फेकून दिले होते. दरम्यान, दोन्ही अल्पवयीन आरोपींना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले असून, त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नलगोंडा पोलिसांनी माध्‍यमांना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT