हैदराबाद: पतीनेच आपल्या पाच महिन्यांच्या गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणानंतर त्याने हे हत्याकांड घडवले. ही घटना शनिवारी घडली. धक्कादायक म्हणजे, हत्येनंतर त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते मुसी नदीत फेकून दिले, तर शिर नसलेले धड घरातच ठेवले. स्वाती रेड्डी (वय २१) असे मृत विवाहितेचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणी तिचा पती महेंद्र रेड्डी (वय २७) याला अटक केली आहे.
पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महेंद्र याने हेक्सा ब्लेडने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे केले. तिचे शिर, हात आणि पाय मुसी नदीत फेकून दिले. तर, शिर आणि पाय नसलेले धड त्याने आपल्या खोलीतच ठेवले होते, अशी माहिती मलकजगिरी विभागाच्या पोलीस उपायुक्त (डीसीपी) पी. व्ही. पद्मजा यांनी दिली. महेंद्र याने मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले आणि ते नदीत फेकण्यासाठी तो तीन वेळा नदीवर गेला. पोलिसांनी घरातून पीडितेचे धड आणि पाय जप्त केले आहेत, तर इतर अवयवांचा शोध सुरू आहे. हत्येनंतर आरोपीने आपल्या बहिणीला फोन करून पत्नी हरवल्याची माहिती दिली. मात्र, बहिणीला संशय आल्याने तिने एका नातेवाईकाला सांगितले. त्या नातेवाईकाने महेंद्र याला पोलीस ठाण्यात नेले. तिथेही त्याने पत्नी हरवल्याचा बनाव केला, परंतु कसून चौकशी केली असता, त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली, असे डीसीपी पद्मजा यांनी सांगितले.
त्याच्या कबुलीजबाबाच्या आधारे, खून आणि गुन्ह्याचा पुरावा नष्ट केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पती महेंद्रला अटक करण्यात आली आहे. सापडलेले अवशेष गांधी रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आले असून, पोलीस नदीत उर्वरित अवयवांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यामागे कौटुंबिक कलह आणि संशय हे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. महेंद्र आणि स्वाती दोघेही तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्यातील रहिवासी असून शेजारी राहत होते. जानेवारी २०२४ मध्ये त्यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर ते हैदराबादला स्थायिक झाले आणि बोडुप्पल येथे भाड्याच्या घरात राहत होते. लग्नानंतर सुमारे एक महिना त्यांचे आयुष्य आनंदी होते. त्यानंतर त्यांच्यात वारंवार भांडणे होऊ लागली. एप्रिल २०२४ मध्ये, स्वातीने विकाराबादमध्ये महेंद्र विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गावातील ज्येष्ठांनी मध्यस्थी करून त्यांच्यात समेट घडवून आणला होता.
स्वातीने हैदराबादच्या पंजागुट्टा भागातील एका कॉल सेंटरमध्ये तीन महिने काम केले. मात्र, तिच्या चारित्र्यावर संशय घेत महेंद्र याने तिला नोकरी सोडायला लावली. मार्चमध्ये ती गर्भवती राहिली. तरीही त्यांच्यातील भांडणे सुरूच होती. २२ ऑगस्ट रोजी, स्वातीने महेंद्रला सांगितले की ती वैद्यकीय तपासणीसाठी विकाराबादला जात आहे, त्यानंतर काही दिवस माहेरी राहायला जाणार आहे. याला महेंद्रने नकार दिल्याने त्यांच्यात मोठे भांडण झाले. तिने त्याला शिवीगाळ केली आणि त्याच दिवशी महेंद्रने तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला, असे पोलिसांनी सांगितले.