Hyderabad viral CHO dog post |
हैदराबाद : हैदराबाद येथील एका कंपनीने कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. हा अधिकारी कार्यालयातील वातावरण सकारात्मक ठेवण्याचं काम करतो. विशेष म्हणजे तो माणूस नसून गोल्डन रिट्रीव्हर जातीचा एक कुत्रा आहे. त्याचे नाव 'डेन्व्हर' आहे. सोशल मीडियावर या कर्मचाऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
डेन्व्हरला कंपनीसाठी 'चीफ हॅपीनेस ऑफिसर' म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. उद्योजक राहुल अरेपका यांनी लिंक्डइनवर ही माहिती शेअर केली आहे. डेन्व्हर कोडिंग करत नाही. त्याला काही फरक पडत नाही. तो फक्त येतो, मनं जिंकतो आणि ऊर्जा टिकवून ठेवतो, असे अरेपका यांनी सांगितलं. त्यांनी डेन्व्हरला कंपनीमध्ये 'चीफ हॅपीनेस ऑफिसर' म्हणून नियुक्त करण्यात आल्याचे सांगितले. तसेच, आम्ही आता अधिकृतपणे पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल आहोत, हा सर्वोत्तम निर्णय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डेन्व्हरला कंपनीत सर्वोत्तम भत्ते मिळत असल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
ही पोस्ट सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आली होती. ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सोशल मीडिया वापरकर्ते प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी ही नियुक्ती चांगली असल्याचे सांगत कंपनीचे कौतुक केले आहे. पाळीव प्राणी ऑफिसमध्ये नेमण्याच्या कल्पनेचं कौतुक करत काहींनी यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार होईल, अस म्हटलं आहे.
“CHO सगळ्यांना आनंदी ठेवून थकलेला दिसतोय!”
“खूप छान कल्पना, यामुळे तुमच्या कंपनीच्या उत्पादन क्षमतेवर सकारात्मक परिणाम होईल.”
“वा! डेन्व्हर किती गोड आहे! त्याचा चेहरा पाहूनच मूड फ्रेश होतो.”
“जर अजून जागा असेल, तर माझा पाळीव कुत्रा ‘पिक्सेल’ही तयार आहे. तो दोन पायांवर उभा राहतो आणि जीभ बाहेर काढतो!”
“CHO इतका देखणा आहे, पण त्याच्या चेहऱ्यावरचं एक्स्प्रेशन सांगतंय की अर्ध्या दिवसाची सुट्टी मंजूर झाली नाही!”
“डेन्व्हरचं हेल्थ इन्शुरन्स कंपनीने घेतलं का?”