पुढारी ऑनलाईन डेस्क : म्यानमारमध्ये शुक्रवारी ७.७ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपानंतर मोठा विध्वंस झाला. दुसऱ्या दिवशी, शनिवारी म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आणि भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या मांडलेमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. बर्माच्या अधिकृत स्टेट मीडिया एमआरटीव्हीच्या रिपोर्टनुसार, या शक्तिशाली भूकंपामुळे १,००२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या भूकंपामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. यामुळे मृतांचा आकडा १० हजारपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे, अशी भीती युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने शुक्रवारी व्यक्त केली होती.
दरम्यान, या नैसर्गिक आपत्तीनंतर भारत म्यानमारच्या मदतीला धावला आहे. भारताने शनिवारी 'ऑपरेशन ब्रह्मा' अंतर्गत १५ टन मदत साहित्य म्यानमारला पाठवले. भारतीय हवाई दलाच्या ए सी-१३०जे या लष्करी वाहतूक विमानाने ही मदत यांगूनला रवाना करण्यात आली.
भारताने पाठवलेल्या मदत साहित्यात तंबू, स्लीपिंग बॅग, ब्लँकेट्स, अन्नपदार्थांची पाकिटे, पाणी शुद्धीकरण यंत्र, सौर दिवे, जनरेटर सेट्स आणि औषधांचा समावेश होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी 'X' वर पोस्ट करत सांगितले की, "ऑपरेशन ब्रह्मा सुरू करण्यात आले आहे. भारताकडून मानवतावादी दृष्टीकोनातून मदतीची पहिली खेप म्यानमारमधील यांगून विमानतळावर पोहोचली आहे."
८० सदस्यांचे एनडीआरएफ पथकही म्यानमारला रवाना झाले आहे. हे पथक म्यानमारमधील बचावकार्यात मदत करेल, अशी माहिती एस. जयशंकर यांनी दिली.
एमआरटीव्हीच्या रिपोर्टनुसार, या शक्तिशाली भूकंपातील मृतांचा आकडा १,००२ वर पोहोचला आहे. तर २,३७६ लोक जखमी झाले असून ३० जण बेपत्ता आहेत. यामुळे म्यानमार आणि थायलंडमधील मोठ्या प्रमाणात इमारती, पूल कोसळले असून पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.
शुक्रवारी म्यानमार, बँकॉकला भूकंपाचा तीव्र क्षमतेचा तडाखा बसल्याने दोन्ही देशांमध्ये हाहाकार उडाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमध्ये होता. त्याचे धक्के थायलंडमधील बँकॉकलाही बसले. या भूकपांची तीव्रता ७.७ रिश्टर स्केल होती. म्यानमारसह थायलंड, चीन, बांगला देश आणि भारत या पाच देशांची भूमीही या भूकंपाने हादरली. दरम्यान, शुक्रवारच्या म्यानमारमध्ये झालेल्या ७.५ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपानंतर, शनिवारी पुन्हा ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले.