नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) देशाच्या अंतराळ मोहिमांसाठी पुढील चार दशकांचा एक महत्त्वाकांक्षी आराखडा सादर केला आहे. यानुसार, मंगळावर 3-डी प्रिंटेड घरे उभारण्याची आणि लाल ग्रहावर मानवाला उतरवण्यासाठी पूर्वतयारी मोहिमा सुरू करण्याची भारताची योजना आहे.
हा आराखडा ‘इस्रो’ने देशभरात केलेल्या विचारविमर्शातून तयार झाला असून, गेल्या आठवड्यात नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या सोहळ्यात तो अंतिम करण्यात आला. 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इस्रो’साठी 2035 पर्यंत ‘भारतीय अंतरिक्ष स्टेशन’ उभारण्याचे आणि 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीराला चंद्रावर उतरवण्याचे लक्ष्य ठेवले होते.
या आराखड्यानुसार, भारताची 2047 पर्यंत चंद्रावर मानवी तळ (क्रू स्टेशन) उभारण्याची योजना आहे. तसेच, तेथे खनिजे आणि इतर संसाधनांचे उत्खनन करणे, चंद्राच्या पृष्ठभागावर मानवी वाहने चालवणे आणि आंतरग्रहीय मोहिमांना इंधन पुरवण्यासाठी इंधन डेपो तयार करण्याचीही योजना आहे. यामुळे अंतराळवीरांना पृथ्वीच्या एकमेव नैसर्गिक उपग्रहावर दीर्घकाळ वास्तव्य करण्यास मदत होईल.
‘इस्रो’ने आपल्या प्रक्षेपण यानांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्याची योजना आखली आहे, ज्याद्वारे एकाच मोहिमेत 150 टन वजनाचे पेलोड कक्षेत नेण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या, ‘इस्रो’च्या ॠडङत मार्क-खखख या प्रक्षेपकाची क्षमता भूस्थिर हस्तांतरण कक्षेत 4 टन आणि पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 8 टन पेलोड नेण्याची आहे.
अंतराळ संस्था सध्या ‘लुनार मॉड्यूल लॉन्च व्हेईकल’ विकसित करत आहे. लाँच व्हेईकलची उंची 119 मीटर (सुमारे 40 मजली इमारतीइतकी) असेल आणि ते 2035 पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. 2040 मध्ये नियोजित असलेल्या चंद्रावरील पहिल्या मानवी मोहिमेसह इतर चंद्रमोहिमांसाठी याचा वापर केला जाईल.