दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रण आणि सामाजिक समतोल यासंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले आहे. गुरुवारी (दि. 28) आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, प्रत्येक भारतीय दांपत्याने राष्ट्रहिताच्या दृष्टीने तीन अपत्ये जन्माला घालून त्यांचे पालनपोषण करणे आवश्यक आहे.
मोहन भागवत म्हणाले, ‘जगातील सर्व शास्त्रे सांगतात की ज्या समाजाचा जन्मदर 3 पेक्षा कमी आहे, तो हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर असतो. वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उशिरा विवाह टाळून आणि तीन अपत्यांना जन्म देऊन आई-वडील आणि मुलांचे आरोग्य चांगले राहते. भारतातील प्रत्येक नागरिकाने हे लक्षात घ्यावे की, आपल्या कुटुंबात तीन मुले असावीत. मुलांना एकमेकांशी समन्वय साधायला शिकता येते. त्यांच्यात अहंकाराचे व्यवस्थापन होते आणि भांडणे कमी होतात.’
सरसंघचालक पुढे म्हणाले, देशातील नागरिकांना उद्देशून सांगितले की, ‘भारताचा सध्याचा सरासरी जन्मदर २.१ आहे, जो गणितात तांत्रिकदृष्ट्या योग्य वाटतो, पण मानवी जीवनात त्याचा अर्थ तीन अपत्ये असा होतो. प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबात तीन अपत्ये असावीत असा विचार करावा. मात्र, त्याचा आर्थिक भारही स्वीकारावा आणि तीनपेक्षा अधिक अपत्ये टाळावीत.’