राष्ट्रीय

पाऊस कसा व का मोजतात?

Pudhari News

पणजी; मनाली प्रभुगावकर : राज्यात मान्सूनला सुरुवात झालेली आहे. एका भागात इतका मिलिमीटर पाऊस पडला तितका सेंटीमीटर, इंच पाऊस पडला म्हणजे नेमका किती असेल, अतिवृष्टी होणार, मुसळधार पाऊस पडणार म्हणजे नेमका किती पाऊस पडणार, असा विचार अनेक वेळा पडतो. त्यासाठी पाऊस मोजला कसा जातो व कशाप्रकारे याबद्दलची माहिती आपण आज जाणून घेऊया….

पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक यंत्राचा वापर केला जातो. लिटर प्रतिचौरस मीटर किंवा मिलिमीटर यावरून पाऊस मोजला जातो. यात 'मिलिमीटर' व 'इंच' परिमाण वापरले जाते. ठराविक वेळत झालेली पर्जन्यवृष्टी मोजण्यासाठी पर्जन्यमापक (रेनगेज) एक हवामानशास्त्रीय साधन आहे. पाऊस मोजण्यासाठी लागणारी रेनगेज वेगवेगळ्या प्रकारची असतात. काहीजण पाऊस मोजण्यासाठी मापन तंत्र वापरतात, तर काही पूर्णपणे स्वयंचलित असतात.

अधिक वाचा : गोवा : कोणी नेटवर्क देतं का नेटवर्क!

कलेक्टर फनेल व गोळा केलेले पाणी मोजण्याचे यंत्र हे रेनगेजचे दोन महत्त्वपूर्ण भाग आहेत. रेनगेज फनेलच्या अंतर्गत भागाचा पृष्ठभाग ओला होऊ नये यासाठी विशेष कोटिंग असते. फनेलची शंकू जास्तीत जास्त खोल असते, ज्यामुळे पाण्याचा शिडकाव होत नाही. 

अधिक वाचा : भारतीय संघ श्रीलंकेत दाखल, बीसीसीआयनं केले फोटो शेअर

पावसाचे मोजमाप मॅन्युअल होते. हवामान तंत्रज्ञ नियमितपणे पावसाचे प्रमाण तपासतात व हे युनिट रिकामे करतात. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, काही रेनगेजला सेन्सर असतात, ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक पध्दतीने माहिती मिळते. मॅन्युअल रेनगेज विश्वसनीय व अचूक असतात.

रेनगेजचे ग्रेज्युएटेड सिलेंडर (स्टँडर्ड किंवा डिरेक्ट रिडिंग गेज), टिपिंग बकेट, वेइंग (वजन) गेज आणि ऑप्टिकल असे चार प्रकार आहेत.

पर्जन्यमापक ठेवताना घेतात ही काळजी :

पाऊस गोळा करणारे यंत्र सामान्यत: जमिनीपासून 3 फूट उंचीवर ठेवले जाते. पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक ठेवताना, त्या ठिकाणापासून किमान 30 मीटरच्या अंतरात झाड, इमारत असे अडथळे नसावेत. सपाट प्रदेशामध्ये साधारणत: 100 चौरस किलोमीटर क्षेत्राच्या परिसरात किमान एक पर्जन्यमापक असण्याची गरज आहे.

पावसाचे मोजमोपन आवश्यक आहे कारण….

पावसाच्या प्रमाणामुळे भूगर्भात पाण्याची पातळी किती असेल व पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल की नाही याचाही अंदाज लावता येतो. वर्षभरात किती पाऊस पडला, यावरून पुढील वर्षी किती पाऊस पडेल व गतवर्षी किती पाऊस पडला होता, याचा नेमका अभ्यास करण्यासाठी पाऊस मोजला जातो. पावसाच्या प्रमाणावरून पाऊस किती पडेल याचा अंदाज लावणे सोयिस्कर होते.

रेनगेज कसे काम करतात…

1) ग्रेज्युएटेड सिलेंडर : यात सिलिंडरवर पावसाची पोचलेली एकूण उंची मोजून एकूण पावसाची नोंद केली जाते. हे पाऊस मोजण्याचे सरळ, सोपे साधन आहे. या यंत्राला फनेल बसवलेले असते. जास्तीच्या पावसात पाणी बाहेर पडू नये, म्हणून फनेलचा आतील भाग निमुळता केलेला असतो. फनेलच्या बाहेरील बाजूला प्रमाण मोजण्याच्या खुणा असतात त्यानुसार पाण्याच्या पातळीवरून पाऊस मोजला जातो.

2) टिपिंग बकेट रेन-गेज : या यंत्राला जोडलेल्या फनेलमधून पाणी एका भांड्यात सोडले जाते. एका विशिष्ठ प्रमाणावर पाणी भरते तेव्हा या भांड्यातून पाणी अपोआप एका नळीमधून काढून टाकले जाते. यामुळे 24 तासांत पडलेल्या पावसाचे अचूक प्रमाण मोजता येते. हे गेज एकूण पावसाव्यतिरिक्त पर्जन्यमानाचे प्रमाण देखील मोजतो. परंतू, जेव्हा पर्जन्यवृष्टीची तीव्रता खूपच जास्त असतेे तेव्हा, हे साधन बंद पडून चुकीची माहिती देऊ शकते. जर पाऊस बकेट भरायच्या आतच थांबला, तर बकेटमधील पाणी मोजले जात नाही.

3)  वजनाद्वारे पर्जन्यमापन करणारे यंत्र : हे यंत्र दैनंदिन यंत्रापेक्षा थोडे वेगळे असते. यात वजनाद्वारे पाऊस मोजला जातो. पावसाच्या वजनावरून पावसाचे प्रमाण ठरते. हे बर्फ व गारांसारखा घन वर्षाव देखील मोजू शकते. मात्र, हे महाग असते व याला टिपिंग बकेटपेक्षा जास्त देखभाल आवश्यक आहे.

4) ऑप्टिकल गेज : ऑप्टीकल रेन गेज हे अद्ययावत यंत्र असून याला लेझर डायोड आणि फोटो ट्रांजिस्टर डिटेक्टर जोडलेले असतात. एका ठराविक पातळीपर्यंत पाणी जमा झाल्यानंतर ते पाणी भांड्यात उलटले जाते. उलटणार्‍या पाण्यामुळे भांड्यातील लेझर बीम सुरू होते व या लेझर बीममुळे यंत्रात फोटो डिटेक्टरच्या सहाय्याने पाण्याची नोंद केली जाते. सेन्सरमुळे अचूक नोंद मिळते.

राज्यात अधिक रेनगेजची गरज : कुमार


गोव्यातील पर्जन्यमानाचे मोजमाप राज्याच्या आर्थिक बाजूतही महत्वाची भूमिका बजावते. पर्यटन असो वा कृषी क्षेत्र, सर्व पावसाळा म्हणजेच मान्सूनवर अवलंबून असते. अवकाळी पाऊस, शेती तसेच पर्यटन उद्योगातही समस्या निर्माण करू शकतो. पावसाचे मोजमापन करणारी थेट पद्धत गोव्यातील 'रेनगेज' स्थानकांमध्ये वापरली जाते. राज्यातील दुर्गम ठिकाणांवर पावसाचे मोजमापन होण्यासाठी अधिक रेनगेजची आवश्यकता आहे. पणजीतील आल्तिनो येथे रिमोट सेंसिंगव्दारे डॉप्लर रडारच्या मदतीने पावसाचे मोजमापन केले जाते.

– डॉ. एम.आर. रमेश कुमार, एनआयओचे हवामानशास्त्रज्ञ (निवृत्त)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT