अनिल साक्षी
जम्मू : श्रीनगरजवळ असलेल्या नौगाम पोलिस ठाण्यामध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या एका भीषण स्फोटात किमान 9 जणांचा मृत्यू झाला असून, 32 जण जखमी झाले आहेत. अधिकार्यांनी हा स्फोट अपघाती असल्याचे म्हटले आहे. स्फोट इतका शक्तिशाली होता की, पोलिस ठाण्याच्या इमारतीचे नुकसान झाले, तर परिसरातील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि त्याचे हादरे काही किलोमीटरपर्यंत जाणवले. ही स्फोटके दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंधित आहेत. मृतांमध्ये एक पोलिस निरीक्षक, फॉरेन्सिक टीमचे तीन तज्ज्ञ, दोन महसूल अधिकारी, दोन फोटोग्राफर आणि एका स्थानिक नागरिकाचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूल प्रकरणातून जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांचे नमुने गोळा करत असताना हा स्फोट झाला. अधिकार्यांनी सांगितले की, रसायनांच्या जटिल रचनेमुळे हा स्फोट झाला असावा. जप्त केलेल्या स्फोटकांमध्ये अमोनियम नायट्रेटसह एकूण 360 किलो स्फोटके होती. ही स्फोटके अटक करण्यात आलेला आरोपी डॉ. मुजम्मिल गनाई याने फरिदाबाद येथे भाड्याने घेतलेल्या घरातून जप्त करण्यात आली होती आणि नौगाम पोलिस ठाण्यामध्ये ठेवण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) टीम, स्थानिक पोलिस कर्मचारी आणि महसूल अधिकारी यांच्या समावेशासह नियमित तपासणी आणि नमुना गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असताना हा स्फोट झाला. जखमींमध्ये 27 पोलिस कर्मचारी, दोन महसूल अधिकारी आणि परिसरातील तीन नागरिकांचा समावेश आहे.
दहशतवादी मॉड्यूलचा वेगाने तपास सुरू
पोलिस ठाण्यामध्ये स्फोटके साठवून ठेवण्यात आली होती; कारण या मॉड्यूलची प्राथमिक केस येथेच नोंदवली गेली होती. बुरहाम, नौगाम येथे पोलिस आणि सुरक्षा दलांना धमकावणारी पोस्टर्स लावल्यानंतर ऑक्टोबरच्या मध्यात नौगाम पोलिस ठाण्यामध्ये 17 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही फुटेजच्या तपासातून आरिफ निसार दर, यासीर-उल-अशरफ आणि मकसूद अहमद दर या तीन आरोपींना अटक झाली. त्यांच्या चौकशीतून मौलवी इरफान अहमद याला पकडण्यात आले, त्याला डॉक्टरांमध्ये सहज प्रवेश असल्याने तो त्यांना कट्टरपंथी बनवत होता.
पोलिस महासंचालकांनी सांगितले स्फोटाचे कारण
जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक नलीन प्रभात यांनी सांगितले की, नौगाम पोलिस ठाण्यामध्ये झालेला स्फोट एक अपघात होता, त्याची कारणे शोधण्यासाठी तपास सुरू आहे. 9 नोव्हेंबर रोजी फरिदाबाद येथून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली होती. जप्त केलेल्या सामग्रीचे स्वरूप खूप मोठे असल्यामुळे, टीम गेल्या दोन दिवसांपासून पुढील फॉरेन्सिक आणि रासायनिक तपासणीसाठी नमुने घेण्याची प्रक्रिया करत होती. अत्यंत खबरदारी घेऊन हे काम सुरू असताना, दुर्दैवाने हा अपघाती स्फोट झाला. या घटनेमागील अन्य कोणत्याही अटकळी अनावश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. स्फोटामुळे पोलिस ठाण्याची इमारत आणि झालेले इतर नुकसान निश्चित करण्याचे काम सुरू आहे.