Honeymoon murder in Bihar
औरंगाबाद (बिहार) : नात्यांना काळिमा फासणारी एक थरारक घटना बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातून समोर आली आहे. एका नववधूने लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच आपल्या पतीची निर्घृण हत्या घडवून आणली. कारण होतं, तिचं ५२ वर्षांच्या मामासोबत असलेलं तब्बल १५ वर्षांपासूनचं अनैतिक प्रेमसंबंध. नुकत्याच गाजलेल्या मेघालय हनिमून हत्याकांडाची आठवण करून देणाऱ्या या घटनेने पुन्हा खळबळ उडाली आहे.
सुरुवातीला ही सुपारी देऊन केलेली हत्या असल्याचा संशय होता, पण जेव्हा पोलीस तपासाची चक्र फिरली, तेव्हा या हत्येची मुख्य सूत्रधार मृत प्रियांशूची पत्नी, गुंजा सिंह (वय ३०), हीच निघाली. सत्य समोर आल्यावर लग्नासारख्या पवित्र नात्याच्या आड रचलेला हा क्रूर कट पाहून पोलीस आणि स्थानिक नागरिकही हादरले आहेत.
औरंगाबादचे पोलीस अधीक्षक अंबरीश राहुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंजा सिंह हिचे तिच्याच मामासोबत, जीवन सिंह (वय ५२) याच्यासोबत गेल्या १५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांच्या दबावामुळे तिने मे महिन्यात प्रियांशू नावाच्या तरुणासोबत लग्न केले, पण तिचे मन या लग्नात रमत नव्हते. आपले प्रेमसंबंध लपवण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि पतीचा अडथळा दूर करण्यासाठी तिने अखेर एक धक्कादायक निर्णय घेतला. पोलिसांच्या मते, गुंजाने पतीच्या हत्येचा कट रचण्यासाठी मेघालयमधील बहुचर्चित हनिमून हत्या प्रकरणातून प्रेरणा घेतली, त्या घटनेतही एका नववधूनेच हनिमूनला गेल्यावर पतीचा जीव घेतला होता.
गुंजा आणि तिचा मामा जीवन यांनी मिळून हत्येचा एक अचूक कट रचला. जीवनने झारखंडमधील आपल्या दोन साथीदारांना, जयशंकर चौबे आणि मुकेश शर्मा यांना या कामासाठी तयार केले. हत्येसाठी लागणारी सिम कार्ड्स आणि इतर सर्व व्यवस्था त्याने केली. हत्येच्या रात्री प्रियांशू वाराणसीहून परत येत होता. त्याने नेहमीप्रमाणे आपण कुठे पोहोचलो आहोत, हे सांगण्यासाठी पत्नी गुंजाला फोन केला. मात्र, हाच कॉल त्याच्या मृत्यूचे कारण ठरला. गुंजाने क्षणाचाही विलंब न करता प्रियांशूच्या गाडीची माहिती आणि लोकेशन मारेकऱ्यांपर्यंत पोहोचवले. काही क्षणांतच, मारेकऱ्यांनी प्रियांशूची गाडी अडवून त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्याची जागीच हत्या केली.
पोलिसांनी गुंजाला बुधवारी संध्याकाळी अटक केली. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या गुंजाने पोलिसी खाक्या दाखवताच हत्येच्या कटाची कबुली दिली. तिच्या दोन्ही साथीदारांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, तर मुख्य आरोपी आणि तिचा प्रियकर असलेला मामा जीवन सिंह अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी गुंजाचा मोबाईल फोन जप्त केला असून, त्यातील कॉल रेकॉर्ड्स या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरणार आहेत.