नवी दिल्ली : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) पहिल्या महिला राखीव बटालियनच्या स्थापनेला गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे. यामध्ये १ हजारपेक्षा जास्त महिला कमांडरचा समावेश असेल. सीआयएसएफ मुख्यालयाने नवीन बटालियनच्या मुख्यालयांसाठी भरती, प्रशिक्षण आणि ठिकाणांची निवड करण्याची तयारी सुरू केली आहे. व्हीआयपींची सुरक्षा, विमानतळांची सुरक्षा आणि दिल्ली मेट्रोची सुरक्षेसाठी सक्षम कमांडर तयार करण्यासाठी महिला बटालियनला प्रशिक्षण दिले जाणार आहे.
गृह मंत्रालयाने मंजुरी दिलेल्या या महिलांच्या बटालियनमध्ये वरिष्ठ कमांडंट - रँक अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एकूण १ हजार २५ महिला कर्मचारी कार्यरत असतील. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे सध्या १२ राखीव बटालियन आहेत. नावाप्रमाणेच, या तुकड्या राखीव ठेवल्या जातात आणि गरज पडल्यास त्यांना सुरक्षेसाठी तैनात केले जाते. त्याप्रमाणेच आता सीआयएसएफची राखीव महिला बटालियन असेल.
संसदेची सुरक्षा, निवडणूक प्रक्रियेमध्ये सुरक्षा प्रदान करणे, विमानतळांची सुरक्षा, मेट्रो सुरक्षा, ऐतिहासिक वास्तूंची सुरक्षा करणे यांसारख्या ठिकाणी सीआयएसएफच्या जवानांची महत्वाची भूमिका आहे. यामध्ये प्रत्येक ठिकाणी महिला कमांडर तैनात आहेत. मात्र, आता सरकारकडून विशेष महिला बटालियनच्या स्थापनेला मंजुरी मिळाल्याने या तुकडीत सर्व महिला असतील. ही नवीन बटालियन भारताच्या सुरक्षा दलांमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. महिला बटालियनने सुरक्षा क्षेत्रात लैंगिक समानतेला चालना देण्याचे काम करेल, अशी अपेक्षा गृह मंत्रालयाला आहे.