नवी दिल्ली : केवळ मुस्लिम पुरूषाशी लग्न केल्याने हिंदू धर्मातून इस्लाम धर्मात आपोआप धर्मांतर होत नाही, असे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले. मालमत्तेच्या विभाजनाशी संबंधित एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले की, केवळ मुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्याने हिंदू व्यक्तीचा धर्म आपोआप बदलत नाही. लग्नानंतर महिलेने धर्म बदलला नसल्याने तिला तिच्या वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. सुनावणीवेळी न्यायमूर्ती जसमीत सिंह म्हणाले की, महिलेने हिंदू धर्माचा त्याग करून इस्लाम धर्म स्वीकारला आहे, हे सिद्ध करण्यासाठी प्रतिवादींनी कोणतेही ठोस पुरावे सादर केले नाहीत. महिलेने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे की, तिच्या विवाहानंतरही ती हिंदू धर्माचे पालन करत आहे. न्यायालयाने असेही म्हटले आहे की, महिलेने तिचा धर्मांतर केले नसल्यामुळे, तिला कुटुंब मालमत्तेतील तिचा वाट्यावर दावा करण्याचा अधिकार आहे.
दरम्यान, दिल्लीतील रामदास यांचे दोन लग्न झाले आहेत. त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुली, तर दुसऱ्या पत्नीपासून दोन मुले आहेत. २००५ मध्ये हिंदू वारसाहक्क दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर, मुलींनाही त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत हक्क मिळत आहे. यानुसार २००७ मध्ये, मोठ्या मुलीने मालमत्तेवर दावा दाखल केला. यानंतर तिच्या वडिलांच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलांनी या दाव्याला विरोध केला. दरम्यान, वडिलांनी असा दावा केला की, त्यांची मोठी मुलगी आता हिंदू नाही. कारण तिने पाकिस्तानी वंशाच्या मुस्लिम पुरुषाशी लग्न केले आहे आणि आता ती ब्रिटनमध्ये राहते. त्यामुळे, त्यांच्या मालमत्तेवर त्याचा कोणताही अधिकार नाही.