नवी दिल्लीः दिल्लीतील कॅनडाच्या उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू शेख ग्लोबल फोरमने रविवारी आंदोलन केली. कॅनडात हिंदू मंदिरांवर झालेले हल्ले आणि तोडफोडीच्या विरोधात आंदोलन केले. त्यामुळे कॅनडाच्या उच्चायुक्तालयाबाहेर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. उच्चायुक्तालयाबाहेर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती आणि आंदोलकांना पोलिसांनी तीन मूर्ती मार्गावर रोखले.
हिंदू शीख ग्लोबल फोरमचे अध्यक्ष तरविंदर सिंह मारवाह म्हणाले की, आमच्या तरुण पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी ड्रग्ज आणले. पंजाबची भरभराट होत असल्याचे पाहून त्यांनी धर्मांतराला सुरुवात केली. आता मंदिरांवर हल्ले करण्याची ही नवी गोष्ट सुरू झाली आहे. हे चुकीचे आणि दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले. आम्ही सर्व एकत्र आहोत हे सांगण्यासाठी आम्ही आलो आहोत. खरा शीख कधीही खलिस्तानी असू शकत नाही, असे त्यांनी म्हटले. तिरंग्याचा आणि आपल्या देशाचा नेहमीच सन्मान व्हावा, अशी आमची इच्छा आहे. भारतातील शीख भारतासोबत उभे आहेत आणि खलिस्तानला पाठिंबा देत नाहीत, असे त्यांनी सांगितले.
कॅनडातील हिंदू मंदिरांना लक्ष्य करणाऱ्या हिंसक घटनांच्या विरोधात, विशेषतः ब्रॅम्प्टनमधील हिंदू मंदिरावर ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्याचा हा निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान, कॅनडात सुरू असलेल्या हिंसाचाराला प्रत्युत्तर म्हणून, भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्यांचा निषेध केला आहे. कॅनडाच्या अधिकाऱ्यांना भारतीय नागरिकांची आणि प्रार्थनास्थळांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हल्ले आणि तोडफोडीवर चिंता व्यक्त केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाच्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली.