नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरवरील राज्यसभेतील विशेष चर्चेला गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी उत्तर दिले. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर त्यांनी प्रतिप्रश्न करत उत्तर दिले. त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी गदारोळ करत सभात्याग केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चर्चेला उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षांची होती.
ऑपरेशन महादेव राबवून पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील ३ अतिरेक्यांचा खात्मा केल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांचा समाचार देखील त्यांनी भाषणात घेतला. हिंदू कधीही दहशतवादी असू शकत नाही, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
अमित शाह म्हणाले की, जम्मू आणि काश्मीर दहशतवादापासून मुक्त होईल. हा नरेंद्र मोदी सरकारचा संकल्प आहे. तसेच पाकव्याप्त काश्मीर घेणार असे आश्वासन देखील त्यांनी दिले. काँग्रेसच्या काळात दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडल्या. त्यामधील दहशतवादी आमच्या सरकारच्या कार्यकाळात मारले गेले. ऑपरेशन सिंदूर हा दहशतवाद्यांच्या हृदयावर हल्ला आहे. जोपर्यंत शत्रू घाबरत नाही किंवा सुधारणा करत नाही तोपर्यंत कोणताही निर्णायक निकाल येत नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने दहशतवादाला कधीही प्रत्युत्तर दिले नाही. आम्ही प्रत्युत्तर दिले. आता दहशतवाद्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दहशतवाद्यांच्या स्वप्नातही भारताचे क्षेपणास्त्रे दिसत असतील. देशातील जनतेसमोर अभिमानाने म्हणतो की, हिंदू कधीही दहशतवादी असू शकत नाही, असे अमित शाह म्हणाले.
अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील सभेत सांगितले होते की दहशतवाद्यांना नेस्तनाबूत केले जाईल. त्यांच्या दूरदृष्टीबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. त्यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द आज खरा ठरला आहे.
अमित शाह म्हणाले की, विरोधकांनी विचारले की दहशतवादी पाकिस्तानी असल्याचा पुरावा काय आहे? पी. चिदंबरम यांना विचारू इच्छितो की, तुम्हाला कोणाला वाचवायचे होते, तुम्हाला लाज वाटत नाही का? असा सवाल त्यांनी केला. चिदंबरम यांनी काँग्रेसची मानसिकता संपूर्ण जगासमोर उघड केली असल्याचे ते म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान केले आहे की, सरकारला धर्माच्या नावावर ऑपरेशन ठेवण्याशिवाय काहीही माहिती नाही. त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हाला कोणते नाव ठेवायचे होते, उत्तर द्या. हे लोक हिंदू-मुस्लिम दृष्टिकोनातून सर्वकाही पाहतात. आपल्या सैन्याच्या युद्धाच्या घोषणेकडे या दृष्टिकोनातून पाहू नये, असे ते म्हणाले. काँग्रेस म्हणत आहेत की 'ऑपरेशन महादेव' हे नाव धार्मिक आहे. ते विसरले आहेत का की, 'हर हर महादेव' हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा नारा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी हर हर महादेवचा जयघोष करून मुघलांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढा दिला, असे शाह म्हणाले.
आता देशात काँग्रेसचे सरकार असते तर पाकिस्तानला तेव्हाच क्लीनचीट मिळाली असती, असे अमित शाह म्हणाले. दहशतवादावर भाजपला प्रश्न विचारण्याचा काँग्रेसला अधिकार नाही. देशात दहशतवाद पसरण्याचे एकमेव कारण म्हणजे काँग्रेसची व्होटबँक आणि तुष्टीकरणाचे राजकारण, असे केंद्रीय गृहमंत्री यांनी राज्यसभेत म्हटले.
गृहमंत्री अमित शाह राज्यसभेतील भाषणाला सुरुवात करताच विरोधी पक्षाने गदारोळ करायला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत देखील बोलावे, अशी विरोधकांची मागणी होती. यावरुन गृहमंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जोरदार खडाजंगी झाली. १६ तासांच्या चर्चेनंतर पंतप्रधानांनी या सभागृहात येऊन त्यांचे विचार मांडावेत आणि आम्ही जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यातील बरेच प्रश्न त्यांच्याशी संबंधित आहेत, असे खर्गे म्हणाले. पंतप्रधान कार्यालयात असतानाही सभागृहात येत नसतील, तर हा सभागृहाचा अपमान आहे. सभागृहाचा अपमान करणे, सदस्यांचा अपमान करणे योग्य नाही, असे खर्गे म्हणाले.
यावर अमित शहा म्हणाले की, विरोधी पक्षाची मागणी योग्य नाही. संसदेच्या समितीच्या बैठकीत हे ठरले होते की, चर्चेला उत्तर कोण देणार? हे सरकार ठरवणार. ते म्हणाले की, काँग्रेस महत्वाच्या चर्चांमध्ये खर्गे यांना बोलू देत नाही आणि आता ते मुद्दे उपस्थित करत आहेत. विरोधी पक्ष सभागृहातून वॉकआऊट करताना शाह म्हणाले की, ते का जात आहेत हे माहिती आहे. कारण त्यांनी इतक्या वर्षांपासून मतपेढीसाठी दहशतवादाला रोखण्यासाठी काहीच केले नाही. म्हणून सभागृह सोडून जात आहेत.