हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर येथे बल्लू पुलाजवळ झालेल्या भीषण भूस्खलनामुळे एक प्रवासी बस ढिगाऱ्याखाली दबली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर तीन व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेनंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन दल मलबा हटवून अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या कामात गुंतले आहेत. बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
परिसरातील नागरिक देखील मदत आणि बचाव कार्यात सहकार्य करत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव कार्य रात्रभर सुरू राहील आणि बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी या बस दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मदत कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. मृत व्यक्तींबद्दल संवेदना प्रकट करत त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना केली आहे. मुख्यमंत्री सुक्खू म्हणाले की, या कठीण प्रसंगी राज्य सरकार बाधित कुटुंबांसोबत पूर्ण ताकदीने उभे आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत पुरविली जाईल.
मुख्यमंत्री सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. ते शिमला येथून संपूर्ण परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. तसेच, मदत आणि बचाव कार्यात अधिक वेग आणण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवून त्यांच्या उपचारांची यथोचित व्यवस्था केली जावी, याची खात्री करण्यासही त्यांनी सांगितले आहे.