नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हिमाचल प्रदेश काँग्रेस आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व स्तरावरील काँग्रेस युनिट बरखास्त केले. यामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटी, सर्व जिल्हा आणि तालुका काँग्रेस कमिट्यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाची सुमार कामगिरी राहिली होती. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये पक्षांतर्गत अनेक घडामोडी घडत होत्या. त्यामुळे काँग्रेसने हा कठोर निर्णय घेतल्याचे समजते.
राज्यातील एकूण घडामोडींचा अभ्यास केल्यानंतर सर्व युनिट्स बरखास्त करण्यात यावेत, अशा प्रकारचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्षांकडे पाठवण्यात आला होता. काँग्रेस अध्यक्षांनी या प्रस्तावाला मान्यता देत सर्व युनिट्स बरखास्त केले. काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी याबद्दलची माहिती दिली.