राष्ट्रीय

Himachal Pradesh Landslide Accident : प्रवाशांवर काळाची झडप! हिमाचलमध्ये गाडीवर कोसळली दरड; १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू!

रस्ता खुला होताच सुरू झालेला दुर्दैवी प्रवास

पुढारी वृत्तसेवा

लाहौल-स्पीती : हिमाचल प्रदेशातील पांगी-उदयपूर मार्गावर एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली आहे. धावत्या चारचाकी गाडीवर अचानक दरड कोसळल्याने १३ पर्यटकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व मृत आणि जखमी हे चंबा भागातील रहिवासी असून, ते पर्यटनासाठी बाहेर पडले असताना परतीच्या प्रवासात काळाने त्यांच्यावर झडप घातली. लाहौल-स्पीती पोलिसांनी या दुर्दैवी घटनेची अधिकृत माहिती दिली आहे.

कुडूनाला येथे काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, लाहौल खोऱ्यापासून सुमारे ६० ते ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या कुडूनाला भागात ही दुर्घटना घडली. कुल्लू येथून पांगीच्या दिशेने निघालेली टाटा सुमो ही गाडी कुडूनाला जवळ पोहोचली असता, अचानक डोंगराचा मोठा भाग भरभराकार गाडीवर कोसळला. काही क्षणांतच संपूर्ण गाडी ढिगाऱ्याखाली दबली गेली.

घटनेची माहिती मिळताच भरमौरचे आमदार जनक राज यांनी चंबा आणि लाहौल-स्पीतीचे जिल्हाधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधून तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले. पोलीस आणि बचाव पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले असून, ढिगाऱ्याखालून एका जखमीला सुखरूप बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस प्रशासनाकडून बचाव कार्याला वेग

अपघाताबाबत माहिती देताना चंबाचे पोलीस अधीक्षक विजय कुमार सकलानी यांनी सांगितले की, ‘प्रवासी लाहौल-स्पीती जिल्ह्याच्या दिशेने प्रवास करत असताना टिंडीजवळ हा अपघात घडला. डोंगराचा एक मोठा भाग थेट त्यांच्या वाहनावर कोसळल्याने १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आमचे बचाव पथक घटनास्थळी मदत कार्यात गुंतले असून जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.’

रस्ता खुला होताच सुरू झालेला दुर्दैवी प्रवास

उदयपूर-किलाड हा मार्ग आदल्या दिवशी झालेल्या भूस्खलनामुळे बंद करण्यात आला होता. त्यामुळे टाटा सुमोतील सर्व प्रवासी तिंदी भागात थांबले होते. शुक्रवारी (दि. २४) रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला. रस्ता मोकळा झाल्याचा दिलासा मानून प्रवाशांनी पांगीच्या दिशेने प्रवास सुरू केला; मात्र कडू नाला जवळ पोहोचताच काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि क्षणार्धात आनंददायी प्रवासाचे रुपांतर भीषण शोकांतिकेत झाले.

प्रशासन आणि स्थानिक बचाव पथकांकडून सध्या जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. बचाव मोहीम पूर्ण झाल्यानंतरच मृत व जखमींचा अंतिम आकडा आणि त्यांच्या ओळखीबाबत अधिक स्पष्टता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT