varanasi to bangalore flight bomb Fear
पुढारी ऑनलाईन :
वाराणसीच्या लाल बहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री एकच गोंधळ उडाला. एक विमान वाराणसीहून बेंगलुरूला जात होते. एका प्रवाशाने आरडाओरड करत दावा केला की, त्याच्या बॅगेत बॉम्ब आहे आणि सर्व प्रवासी मरणार आहेत. अचानक या प्रकारच्या सूचनेमुळे फ्लाइटमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
फ्लाइट रनवेच्या दिशेने जाउ लागले आणि टेकऑफची तयारी सुरू झाली. मात्र या धमकीनंतर पायलटने तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क केला. सुरक्षा प्रोटोकॉलच्या अनुशंगाने हे विमान तात्काळ आयसोलेशन झोनमध्ये नेण्यात आले. या ठिकाणी प्रवासी आणि विमानाची तपासणी करण्यास सुरूवात झाली.
विमानातील एक प्रवासी, जो नंतर कॅनडाचा नागरिक निघाला, त्याने ओरडत सांगितले होते की, त्याच्या बॅगमध्ये बॉम्ब आहे आणि तो लवकरच फुटणार आहे. इतकी मोठी आणि भयंकर गोष्ट ऐकल्यावर विमानातील क्रू मेंबर आणि प्रवाशांमध्ये कमालीचे दहशतीचे वातावरण पसरले. तात्काळ विमानाला सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. या ठिकाणी बॉम्ब डिस्पोजल स्कॉडने सुरक्षा यंत्रणेसोबत तपासाला सुरूवात केली.
जवळपास तीन ते चार तास चाललेल्या तपासणीमध्ये विमानाच्या प्रत्येक भागाची, प्रवाशांची, त्यांच्या सामानाची आणि विमानात असलेल्या प्रत्येक वस्तूची तपासणी करण्यात आली. मात्र या तपासात कोणत्याही प्रकारचे विस्फोटक अथवा तशाप्रकारची वस्तू आढळून आली नाही. यानंतर सर्व प्रवाशांना पुन्हा बोर्ड करण्यात आले. यानंतर विमानाने काहीशा विलंबाने पुन्हा उड्डाण केले. या संपूर्ण प्रकारामुळे प्रवाशांना रात्रभर ताटकळत बसावे लागले. एअरपोर्ट परिसरातही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
धमकी देणारी व्यक्ती ही निशांथ योहानाथन असल्याचे समोर आले. तो कॅनडाचा नागरिक आहे. त्याला अटक करून फूलपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. एसपी पिंडरा, प्रतीक कुमार यांनी सांगितले की, विमान जेंव्हा टेकऑफच्या अवस्थेत होते, तेंव्हाच निशांथने जोर-जोरात ओरडत बॅगेत बॉम्ब असल्याचे सांगितले. सुरक्षा मानकांचे पालन करण्यासाठी विमान आयसोलेशन करून संपूर्ण विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र या तपासणीत काहीच संदीग्ध आढळले नाही. मात्र या प्रकारामुळे या फ्लाइटला तीने ते चार तास विलंबाचा सामना करावा लागला.
एसपींनी सांगितले की, संशयित आरोपीच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर कलमांखाली कारवाई केली जात आहे. यासोबतच, प्रवाशाने असे पाऊल का उचलले याचा अधिक तपास सुरू आहे.