Kerala, Karnataka Rain | केरळम, कर्नाटकात पावसाचे ११ बळी; केदारनाथ मार्गावर दरडी कोसळल्या 
राष्ट्रीय

Kerala, Karnataka Rain | केरळम, कर्नाटकात पावसाचे ११ बळी; केदारनाथ मार्गावर दरडी कोसळल्या

हजारो नागरिक स्थलांतरित; अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळम, कर्नाटक, उत्तराखंड, जम्मू-कश्मीर आणि गुजरातसह विविध भागांत अतिवृष्टीचा फटका बसला असून आतापर्यंत अनेक ठिकाणी जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. केरळममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे ८ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण बेपत्ता आहेत, तर कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात दरड कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.

केरळममध्ये २०९ मदत छावण्या सुरू

केरळममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या माहितीनुसार, आतापर्यंत ५ हजार ७९२ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले असून त्यांच्यासाठी २०९ मदत छावण्या सुरू केल्या आहेत. अतिवृष्टीमुळे २७ घरे उद्ध्वस्त झाली असून १९६ घरांचे नुकसान झाले आहे. अलप्पुझा जिल्ह्यात ११ मदत छावण्यांमध्ये १६९ कुटुंबांतील सुमारे ५८० नागरिकांना आश्रय दिला आहे.

कर्नाटकात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात रविवारी पहाटे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. डोंगराजवळील घरावर दरड कोसळल्याने मल्लिकार्जुन (वय ३५), त्यांची पत्नी नागवेणी (२८) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा संतोष यांचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी तिघेही घरात झोपले होते. मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत.

गुजरातमध्येही पावसाचा जोर

गुजरातमधील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती आहे. मोरबी आणि सुरत शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले. सुरतमध्ये काही भागांतील रस्ते आणि घरांमध्ये दोन ते तीन फूट पाणी भरले. किम नदीची पाणीपातळी वाढल्याने नागरिकांना स्थलांतर करावे लागले.

जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी

जम्मू-कश्मीरमधील किश्तवाड भागात ढगफुटीनंतर अचानक पूरस्थिती निर्माण झाली. अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले असून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल आणि मलबा जमा झाला आहे.

केदारनाथ मार्गावर अडथळे

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग आणि केदार खोऱ्यात भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी दगड कोसळल्याने केदारनाथ मार्ग आणि महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. कावड यात्रेतील भाविकांनाही या परिस्थितीचा फटका बसत आहे. उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला, तर चमोली जिल्ह्यात बद्रिनाथ महामार्गाचा काही भाग खचल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT