Delhi Airport Roof Collapse x
राष्ट्रीय

Delhi Airport Roof Collapse: दिल्लीत पावसाचा कहर; विमानतळाचे छत कोसळले, IGI च्या टर्मिनल 1 मधील घटना

Delhi Airport Roof Collapse: 49 उड्डाणे वळवली, वाहतूक ठप्प, ताशी 82 किमी वेगाने वाहताहेत वारे, सर्वत्र पाणीच पाणी, विमानसेवा विस्कळीत, एकाच रात्रीत 80 मिमी पाऊस

Akshay Nirmale

Heavy Rain in Delhi IGI Airport Terminal 1 Roof Collapse Flights Diverted

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये रविवारी पहाटे जोरदार पावसाने कहर केला. या मुसळधार पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 वर असलेल्या छताचा काही भाग कोसळला.

या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत, ज्यात छताचा मोठा भाग खाली पडलेला दिसत आहे आणि पाण्याचा प्रचंड ओघळ खाली येताना दिसतो.

रविवारी पहाटे सुमारे 2 वाजता आलेल्या वादळासह पावसामुळे, दिल्ली विमानतळावरील एकूण 49 उड्डाणे इतर ठिकाणी वळवण्यातआली. त्यामध्ये 17 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे.

रात्रीत 80 मिलिमीटरहून अधिक पाऊस

दिल्ली विमानतळ प्रशासनाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "24 मेच्या मध्यरात्रीनंतर दिल्लीमध्ये प्रचंड जोराचा वादळी पाऊस झाला. सुमारे 30 ते 45 मिनिटांच्या कालावधीत 80 मिमीहून अधिक पाऊस झाला आणि वाऱ्याचा वेग 70-80० किलोमीटर प्रति तासापर्यंत गेला.

त्यामुळे टर्मिनल 1 च्या आगमन भागाच्या छतावरील बाह्य ताणलेले कपड्याची संरचना (tensile fabric) दबावाखाली थोडीशी बदलली, ज्यामुळे पाणी साचण्याऐवजी वाहून जाऊ शकले."

यामध्ये कोणतीही रचनात्मक हानी झाली नाही आणि टर्मिनलच्या इतर भागांवर त्याचा परिणाम झाला नाही. घटनास्थळी त्वरित काम करून सुरळीत स्थिती पुन्हा बहाल करण्यात आली.

दिल्ली पाणी साचले, कोंडीमुळे वाहतूक संथ गतीने

भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 11.30 ते रविवारी सकाळी 5.30 या सहा तासांच्या कालावधीत 81.2 मिमी पावसाची नोंद झाली आणि 82 किमी/तास वेगाने वारे वाहत होते.

दरम्यान, दिल्लीच्या इतर भागांमध्येही प्रचंड जलभरावाची स्थिती दिसून आली. अनेक रस्त्यांवर वाहनांची वाहतूक संथ झाली आणि काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. मिंटो रोड येथे एक कार पूर्णपणे पाण्यात बुडालेली दिसली.

राजधानीत मे महिन्यात रेकॉर्डब्रेक पाऊस

दिल्लीमध्ये यंदाचा मे महिना विक्रमी पावसाचा ठरला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) च्या माहितीनुसार दिल्लीच्या सफ़दरजंग वेधशाळेने मे महिन्यात आतापर्यंत 186.4 मिमी पावसाची नोंद केली आहे, जी सरासरीपेक्षा जवळपास 9 पट अधिक आहे (सामान्यतः 29.9 मिमी). याआधीचा विक्रम 2008 मध्ये 165 मिमी होता.

गेल्या 24 तासांत दिल्लीच्या विविध भागातील पावसाची नोंद- सफदरजंग-81.4मिमी, लोदी रोड- 69.6 मिमी, आया नगर- 37 मिमी, पालम- 68.5 मिमी, रिज- 69.1 मिमी.

आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू

दरम्यान, फक्त 90 मिनिटांत तापमानात 8-10 अंशांची घसरण झाली. सफदरजंगमध्ये तापमान 31 अंशावरून 21 अंशांवर आले. मे महिन्यातील वादळांमुळे सध्या तरी किमान 12 जणांचा मृत्यू झाला आहे. 300 पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक भागांमध्ये वीज खंडित झाली आहे व पाणी साचले आहे.

या घटनेच्या काही दिवस आधी, उत्तर दिल्लीमध्ये धूळ वादळाचे प्रमाणही पाहायला मिळाले होते. 50-70 किमी/तास वेगाने वारे, हलका पाऊस आणि गारांचा मारा झाला होता, ज्यामुळे वीजपुरवठाही काही भागांमध्ये खंडित झाला होता.

दिल्लीतील हे हवामानाचे अतिवृष्टीसारखे स्वरूप आगामी दिवसांमध्येही काही अंशी कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT