नवी दिल्ली; वृत्तसंस्था : उत्तर आणि ईशान्य भारतात मान्सूनने पुन्हा जोर पकडला असून, अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्ली-एनसीआर परिसरात गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून, वाहतूक कोंडी निर्माण झाली.
दिल्ली, गुरुग्रामसह आसपास झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले. दिल्ली-जयपूर महामार्ग, धौला कुआँ, कालिंदी कुंज, दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे, ग्रीन पार्क आणि एम्स परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. गुरुग्राम पोलिसांनी खासगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा देण्याचे आवाहन केले आहे.
उत्तराखंडमध्ये पर्वतीय भागात परिस्थिती गंभीर झाली आहे. ऋषीकेशमध्ये गंगा नदीची पातळी इशारा पातळीवर गेली आहे. चमोली जिल्ह्यात हेलंगजवळ दरड कोसळल्याने बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद झाला. या मार्गावर सुमारे २०० प्रवासी अडकले आहेत.
रुद्रप्रयाग जिल्ह्यात तिलवाडा परिसरात डोंगरावरून आलेला ढिगारा आणि पाणी केदारनाथ महामार्गावर आल्याने वाहतूक प्रभावित झाली. काही वाहने चिखल आणि दगडांच्या ढिगाऱ्यात अडकली. अलकनंदा नदी धोका पातळीवरून वाहत आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. काही जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी केंद्रांसह बारावीपर्यंत शाळा बंद ठेवल्या आहेत.
उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यात गंगा नदीच्या पाण्यामुळे ३३ गावांमध्ये आणि ४० सरकारी शाळांमध्ये पाणी शिरले आहे. बलिया जिल्ह्यात शरयू नदीच्या पुरामुळे एका आठवड्यात २७ घरे नदीत वाहून गेली आहेत. प्रतापगढ येथे मुसळधार पावसामुळे १०० वर्षे जुने घर कोसळून एका कुटुंबातील सहाजणांचा मृत्यू झाला.
पंजाबमधील लुधियाना येथे पावसामुळे ३० फूट रुंदीचा रस्ता खचून २० फूट खोल खड्डा निर्माण झाला. मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्येही रस्ता खचल्याने कार आणि ई-रिक्षा खड्ड्यात अडकली.
आसाममध्ये पूरस्थिती अद्याप गंभीर असून, गेल्या २४ तासांत आणखी सहाजणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे यंदाच्या मान्सूनमध्ये मृतांचा आकडा ९५ वर पोहोचला आहे. धानसिरी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. राज्यातील १.६ लाखाहून अधिक नागरिक पूरग्रस्त झाले आहेत.