शिमला : येथील संजोली भागात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनानंतर, एका पडझड झालेल्या घरातून चिखल आणि ढिगारा बाहेर काढताना स्थानिक नागरिक.  (फोटो : पीटीआय)
राष्ट्रीय

Heavy Rain | हिमाचलात मुसळधार पाऊस; शिमल्यात दरड कोसळली; किन्नौरमध्ये घर गेले पाण्याखाली

पुढारी वृत्तसेवा

शिमला; वृत्तसंस्‍था : हिमाचल प्रदेशात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शिमला शहरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे, तर किन्नौर जिल्ह्यात पुराचे पाणी एका घरामध्ये शिरल्याने ते पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. तसेच गेल्या वर्षीच उभारण्यात आलेला एक बेली ब्रिज कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

या आपत्तीमुळे अनेक घरांना धोका निर्माण झाला असून प्रशासन सतर्क झाले आहे. शिमल्यात दोन ठिकाणी दरडी कोसळल्या. शिमल्यातील संजोली कॉलेज जवळील रस्त्याखालची भिंत पहाटे कोसळली. त्यामुळे डोंगराचा ढिगारा खालील निवासी घरांच्या दिशेने सरकला. स्थानिक नागरिकांच्या मते, एका खासगी प्रकल्पाच्या खोदकामामुळे हा परिसर कमकुवत झाला होता आणि पावसामुळे ही दरड कोसळली. याशिवाय शिमला परिसरातील राजहाना येथेही दरड कोसळून दोन वाहने ढिगाऱ्याखाली गाडली गेली.

किन्नौरमध्ये पुरानंतर पूल कोसळला

किन्नौर जिल्ह्यात पावसामुळे लिप्पा ओढ्याला पूर आला. पुराचे पाणी लिप्पा बस स्थानकाजवळील एका एकमजली घरात शिरल्याने ते पाण्याखाली गेले. सांगला बस स्थानकाजवळील 'तोंगतोंगचे' ओढ्यावरील बेली ब्रिज पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे वाहून गेला. हा पूल गेल्या वर्षीच बांधण्यात आला होता आणि प्रशासनाने शुक्रवारीच तो असुरक्षित घोषित केला होता.

नहान येथे सर्वाधिक पावसाची नोंद

हवामान खात्याचा इशारा : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नहान येथे सर्वाधिक १५८.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हवामान कार्यालयाने शिमला, कुलू, चंबा, बिलासपूर आणि सिरमौर जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला असून, नागरिकांना नद्या आणि ओढ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT