अहमदाबाद/गुवाहाटी/लखनौ; वृत्तसंस्था : देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. गुजरात, आसाम, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक भागांना पावसाचा मोठा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुजरातमध्ये अनेक जिल्हे पुराच्या पाण्याखाली गेले असून नवसारी, वलसाड, अहमदाबाद आणि सूरतमध्ये परिस्थिती गंभीर झाली आहे.
गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील उमरगाम तालुक्यात अवघ्या १६ तासांत तब्बल ४३ इंच पावसाची नोंद झाली. या विक्रमी पावसामुळे सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. नवसारी जिल्ह्यातील मेघर गाव पूर्णपणे पुरात बुडाले असून घरांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने राज्यभरात आतापर्यंत सुमारे ३८ हजार नागरिकांचे स्थलांतर केल्याची माहिती देण्यात आली आहे. सुरेंद्रनगर जिल्ह्यात एनडीआरएफच्या पथकांनी बोटींच्या मदतीने ६७ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले.
गुजरातमध्ये पुराच्या पाण्याच्या प्रवाहात एक कार वाहून गेली. या कारमध्ये सहा जण होते. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला.
आसाममध्येही मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. गुवाहाटीतील काही भागांमध्ये पेट्रोल पंप पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने सेवा बंद करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गंगा, यमुना यांसह दहा प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सीतापूर जिल्ह्यात रस्त्यांवर पाणी भरल्याने गावकऱ्यांना नावेतून प्रवास करावा लागत आहे.