नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नागालँडमधील आमदार अपात्रता प्रकरण हे दोन्ही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी एकत्र करण्यात आले आहेत. हे प्रकरण आजच्या वेळापत्रकात न्यायालयात सुनावणीला होते. मात्र वेळेअभावी ते सुनावणीपर्यंत येऊ शकले नाही. आता या याचिकेवर पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने १९ मार्चला अजित पवार गटाला नोटीस जारी केली होती आणि त्यांचे उत्तर चार आठवड्यात दाखल करण्यास सांगितले होते, या गोष्टीला जवळपास चार महिने उलटून गेले तरी अजित पवार गटाने उत्तर दाखल केले नव्हते. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अजित पवार गटाने उत्तर दाखल केले आहे. शरद पवार गटानेही अजित पवारांच्या उत्तराला रिजॉईंडर (प्रत्युत्तर) दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह प्रकरणात ही घडामोड महत्वाची आहे. त्यामुळे या प्रकरणावरील या पुढील सुनावणी महत्वाची असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले. यानंतर दोन्ही गटांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच असा दावा केला. हा वाद पुढे निवडणूक आयोगात गेला. आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे घड्याळ चिन्ह हे अजित पवारांकडे देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.