चंदीगड : केंद्रीय अन्वेषण विभागानेबुधवारी पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयात हरियाणा सरकारच्या विविध विभाग व संस्थांच्या निधी गैरव्यवहार प्रकरणात सहा आयएएस अधिकाऱ्यांसह १९ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सीबीआयने दाखल केलेले हे तिसरे आरोपपत्र आहे. हरियाणा सरकारच्या विनंतीवरून राज्य दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी विभागाकडून सीबीआयने या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता.
दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात हरियाणा केडरच्या ६ आयएएस अधिकाऱ्यांसह आयडीएफसी फर्स्ट बँकेचे ३ अधिकारी, एयू स्मॉल फायनान्स बँकेचा एक अधिकारी आणि राज्य सरकारचे इतर ९ अधिकारी अशा एकूण १९ जणांचा समावेश आहे.
या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेंतर्गत गुन्हेगारी कट, फसवणूक, पुरावे नष्ट करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे व वापरणे, खात्यांमध्ये फेरफार, विश्वासघात आणि अपप्रवृत्ती तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली लाचखोरी व गैरवर्तनाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
आरोपपत्रानुसार, आरोपी सरकारी कर्मचाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून हा आर्थिक गैरव्यवहार केला. वित्त विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून आठ सरकारी विभागांचा निधी ठरावीक बँक शाखांमध्ये वळवण्यात आला. हा निधी पुढे बनावट मार्गाने त्रयस्थ व्यक्तींच्या खात्यांमध्ये हस्तांतरित करून विविध खात्यांद्वारे फिरवून रोख स्वरूपात काढण्यात आला.