विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हरियाणा काँग्रेसने पक्षातर्गंत मोठी कारवाई केली आहे. (File photo)
राष्ट्रीय

हरियाणा काँग्रेसमध्ये भूकंप! १० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हरियाणा काँग्रेसने पक्षातर्गंत मोठी कारवाई केली आहे. हरियाणा काँग्रेसने पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत १० नेत्यांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. याबाबतची माहिती अखिल भारतीय काँग्रेस समितीने (AICC) दिली आहे.

तिकीट नाकारल्यानंतर चित्रा सरवरा अपक्ष म्हणून रिंगणात

अंबाला कॅन्टोन्मेंट येथून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या चित्रा सरवरा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. चित्रा सरवरा ह्या माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुडा यांचे विश्वासू निर्मल सिंह यांची कन्या आहेत. त्यांना काँग्रेसने तिकीट नाकारले आहे. यामुळे त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.

सरवरा यांना दुसऱ्यांदा तिकीट नाकारले

सरवरा यांची लढत भाजपचे दिग्गज नेते, सहा वेळा आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल विज तसेच काँग्रेसचे परविंदर सिंह परी यांच्याशी होत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारले होते. त्यावेळीही सरवरा अपक्ष म्हणून लढल्या होत्या. पण विज यांच्या विरोधात त्यांचा पराभव झाला होता. सरवरा ४४,४०० मतांसह दुसऱ्या स्थानी तर काँग्रेसचे वेणू सिंह यांना तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. सरवरा यांचे वडील अंबाला शहर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत.

'या' नेत्यांवर कारवाई

चित्रा सरवरा यांच्यासह सतविंदर राणा, कपूर सिंह नरवाल, वीरेंद्र घोघरियन, सोमवीर घसोला, मनोज कोसलिया, अजित गुलिया, शारदा राठोड, ललित नागर आणि सतवीर भाना या नेत्यांचीही काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे. याबाबतची कारवाई काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT