नवी दिल्ली : महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी तर माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेते अशी दोन्ही महत्वाची पदे विदर्भात दिली आहेत. या निवडीमध्ये प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांना काँग्रेस नेत्या मिनाक्षी नटराजन व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेली जवळीक फायद्याची ठरली आहे.
हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायतराज संघटन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी मीनाक्षी नटराजन अध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून सपकाळ यांनी काम केले. राहुल गांधी व्यक्तीशः राजीव गांधी पंचायतराज संघटनमध्ये लक्ष घालतात. राहुल गांधींना या संघटनेतील कार्यकर्त्यांच्या कामाची पद्धत आणि ओळख अत्यंत चांगली आहे. अनेक वर्षे संघटनेत काम केलेल्या मीनाक्षी नटराजन यांनी स्वतः हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावावर जोर दिल्याचे समजते. सोबतच हर्षवर्धन सपकाळ यांचे शरद पवार यांच्या सोबतही अत्यंत चांगले संबंध आहेत. सपकाळ यांनी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय स्तरावर काम केले असल्यामुळे ते काँग्रेस नेतृत्व आणि पक्ष श्रेष्ठींच्या जवळ आहेत. हा सगळा विचार करत काँग्रेसने त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा दिल्याचे समजते.
१२ फेब्रुवारी २०२१ ला नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. बुधवारी त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकीर्दीला बरोबर ४ वर्ष पूर्ण झाली आणि १३ तारखेला काँग्रेसने नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांना नेमले. नाना पटोले यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणूक, विविध ठिकाणी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुका आणि काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्याही निवडणूक लढवण्यात आल्या. यामध्ये विधानसभा निवडणूक वगळता इतर निवडणुकांमध्ये काँग्रेसला समाधानकारक यश मिळाले आणि म्हणूनच नाना पटोले यांचे राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाच्या ठिकाणी प्रमोशन होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्यापासून इतर सर्व पक्षांचे विधिमंडळ पक्षनेते आणि इतर महत्त्वाच्या नेमणुका पार पडल्या होत्या. काँग्रेस पक्षाच्या नेमणूक मात्र रखडल्या होत्या. काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चाही जोरात सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दोन मोठया बदलांची घोषणा केली. प्रदेशाध्यक्षपदासाठी अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर यांच्या नावाची चर्चा होती. बुधवारी अचानक हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव समोर आले आणि गुरुवारी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष पद राज्याच्या एका भागात तर विधिमंडळ पक्षनेतेपद दुसऱ्या भागात अशा पद्धतीने काँग्रेस पदवाटप करेल, असे कयास बांधले जात होते. मात्र प्रदेशाध्यक्ष पद आणि विधिमंडळ पक्ष नेतेपद अशी दोन महत्त्वाची पदे काँग्रेसने विदर्भात दिली. कारण काँग्रेसला विदर्भातून अपेक्षा आहेत. एकेकाळी विदर्भ काँग्रेसचा गड राहिला होता मात्र गेल्या काही निवडणुकींमध्ये भाजपने तो पुरता उध्वस्त केला. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विदर्भात पक्ष उभा करण्यासाठी काँग्रेसने ही दोन्ही महत्त्वाचे पदे विदर्भात दिल्याचे समजते.
याच आठवड्यात काँग्रेसमध्ये राष्ट्रीय स्तरावर संघटनात्मक नव्या नियुक्त्या होणार आहेत आणि आणखी काही राज्यांचे प्रदेशाध्यक्षही बदलणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून काही नेत्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळण्याचीही शक्यता आहे. यामध्ये मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यशोमती ठाकूर यांचा समावेश असू शकतो.
हर्षवर्धन सपकाळ हे शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात, अशी चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात आहे. तर सपकाळ यांच्या निवडीमागे मिनाक्षी नटराजन यांचा हात असल्याचे मानले जात आहे. राहुल गांधीच्या टीमने या निवडीसाठी महत्वाची भूमिका बजावल्याचे समजते.