Haridwar stampede
हरिद्वार : उत्तराखंडमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या हरिद्वार येथील मनसा देवी मंदिरात दर्शनासाठी जमलेल्या प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी होऊन किमान सहा भाविकांचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि. २७) सकाळी घडली असून, या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे.
गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितले की, "मनसा देवी मंदिरात प्रचंड गर्दी जमल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मी स्वतः घटनास्थळाकडे रवाना होत आहे. या घटनेचा सविस्तर अहवाल येणे बाकी आहे." चेंगराचेंगरीची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, "एसडीआरएफ, स्थानिक पोलिस आणि इतर बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत आणि मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मी या प्रकरणाबाबत स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात आहे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे."