Uttar Pradesh Rajya Sabha Election | केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी, बी. एल. वर्मा यांचा पत्ता कट 
राष्ट्रीय

Uttar Pradesh Rajya Sabha Election | केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी, बी. एल. वर्मा यांचा पत्ता कट

उत्तर प्रदेशात राज्यसभेसाठी भाजपकडून आठ उमेदवारांची घोषणा; प्रियांका सिंग रावत, श्रृती गंगवार यांना संधी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीबाबत भाजपने सोमवारी आपल्या आठ उमेदवारांची नावे जाहीर केली. बाराबंकीच्या माजी लोकसभा खासदार प्रियांका सिंग रावत आणि बरेलीच्या श्रृती गंगवार यांना उमेदवारी देताना भाजपने केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीपसिंग पुरी व अन्‍न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री बनवारीलाल वर्मा या दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता मात्र कट केला आहे.

१० जागांसाठी १६ ऑक्टोबरला मतदान

उत्तर प्रदेशात राज्‍यसभेच्‍या रिक्त होणार्‍या १० जागांसाठी १६ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. पक्षाने दोन महिलांना स्थान देण्यासोबतच ब्राह्मण, ओबीसी व इतर सामाजिक गटांच्या प्रतिनिधित्वाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपचे उमेदवार

भाजपच्‍या यादीत धर्मपाल सिंग, राधाकांत ओझा, प्रकाश पाल, विद्यासागर सोनकर, गोपी कृष्ण पांडेय, प्रियांका सिंग रावत, राम प्रतापसिंग चौहान व श्रृती गंगवार यांची नावे आहेत. पक्षाने संघटनेशी जोडलेल्या अनुभवी नेत्यांसोबतच नव्या चेहऱ्यांनाही यादीत स्थान दिले आहे. श्रृती गंगवार या झारखंडचे राज्यपाल व बरेलीचे ज्येष्ठ भाजप नेते संतोष गंगवार यांच्या कन्या आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालय प्रभारी तरुण चुग यांनी उमेदवारांची यादी जारी केली.

दोन महिला चेहऱ्यांवर विश्वास

भाजपने यावेळी दोन महिलांना तिकिट दिले आहे. माजी खासदार रावत त्या क्षेत्रातील पक्षाचा प्रमुख चेहरा मानल्या जातात. तर, गंगवार यांना उमेदवार बनवण्याकडे पश्चिम उत्तर प्रदेशमधील पक्षाचे सामाजिक व राजकीय समीकरण म्हणून पाहिले जाते.

विजयासाठी ३७ प्रथम पसंतीची मते आवश्यक

१० पैकी ८ जागा भाजपकडे, तर समाजवादी पक्ष (सप) व बहुजन समाज पक्षाकडे (बसप) प्रत्येकी एक जागा आहे. ४०३ सदस्यांच्या उत्तर प्रदेश विधानसभेत सध्या ३९६ सदस्य आहेत. गेल्या ११ महिन्यांत सात आमदारांच्‍या निधनामुळे सदस्यसंख्या घटली आहे. आता राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी उमेदवाराला ३७ प्रथम पसंतीची मते आवश्यक असतील. संख्याबळ पाहता भाजप व त्याचे मित्रपक्ष सात जागा जिंकतील, तर सप दोन जागांवर मजबूत दावा सांगत आहे. दहाव्या जागेवरून चुरस वाढू शकते.

पुरी, वर्मा यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार?

भाजपच्या यादीत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीपसिंग पुरी व केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्‍न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री बनवारी लाल वर्मा यांचे नाव नाही. पुरी यांचा राज्यसभा कार्यकाळ संपत आहे. या दोघांना उमेदवारी न दिल्‍याने केंद्रीय मंत्रिमंडळातून त्यांना निरोप दिला जाणार असल्‍याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT