Hantavirus Infection| अटलांटिकमधील क्रूझवर हंता व्हायरस? तिघांचा मृत्यू 
राष्ट्रीय

Hantavirus Infection| अटलांटिकमधील क्रूझवर हंता व्हायरस? तिघांचा मृत्यू

आफ्रिका किनार्‍यावर जहाज थांबवले

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अटलांटिक महासागरात प्रवास करणार्‍या ‘एमव्ही होंडियस’ या क्रूझ जहाजावर हंता व्हायरसच्या संभाव्य संसर्गामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून, किमान तिघेजण आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य विभागाने या घटनेला दुजोरा दिला आहे.

सध्या हे जहाज आफ्रिकेतील केप व्हर्डेची राजधानी प्राया येथे थांबवण्यात आले असून, संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रवाशांना जहाजातून उतरण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. जहाजावर एकूण सुमारे 170 प्रवासी आणि 71 कर्मचारी असून, त्यांच्यावर वैद्यकीय देखरेख ठेवण्यात येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जहाजावर सहा जणांमध्ये संसर्गासारखी लक्षणे दिसून आली आहेत. यापैकी एका रुग्णामध्ये हंता व्हायरसची प्रयोगशाळेत पुष्टी झाली आहे. एक रुग्ण दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे, तर आणखी दोन रुग्णांना जहाजाबाहेर हलवण्याची तयारी सुरू आहे.

प्रवासाचा मार्ग आणि मृत्यूंची साखळी

नेदरलँडस्च्या ध्वजाखाली नोंदणीकृत हे जहाज 20 मार्च रोजी अर्जेंटिनातील उशुआया येथून रवाना झाले होते. त्यानंतर ते अंटार्क्टिक परिसरातून प्रवास करत अटलांटिक महासागर ओलांडून युरोपकडे जात होते. शेवटी ते स्पेनच्या कॅनरी बेटांपर्यंत पोहोचणार होते. मृतांमध्ये 70 वर्षीय प्रवाशाचा समावेश आहे, ज्याचा मृत्यू जहाजावरच झाला. त्यांचे पार्थिव सेंट हेलेना येथे उतरवण्यात आले. त्यांची पत्नी दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्यानंतर अचानक आजारी पडली आणि नंतर रुग्णालयात तिचाही मृत्यू झाला. तिसर्‍या मृत व्यक्तीचा मृतदेह अद्याप जहाजावरच असल्याची माहिती क्रूझ कंपनीने दिली आहे. या संसर्गाचा उगम नेमका कुठून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जहाज ज्या भागातून प्रवास करत होते, त्या भागात हंता व्हायरसची प्रकरणे नोंदवलेली नव्हती. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, संक्रमण जहाजाच्या आतच पसरले असण्याची शक्यता अधिक आहे.

हंता व्हायरस काय आहे?

हंता व्हायरस हा प्रामुख्याने उंदरांमधून पसरणारा विषाणू आहे. संक्रमित उंदरांच्या लघवी, विष्ठा किंवा लाळेच्या संपर्कात आल्यास मनुष्य संक्रमित होऊ शकतो. या विषाणूमुळे ‘पल्मोनरी सिंड्रोम’ नावाचा गंभीर आजार होतो, ज्यामध्ये फुफ्फुसांवर परिणाम होतो आणि श्वसनास अडचण निर्माण होते. हा विषाणू 1993 साली प्रथम ओळखला गेला. त्यानंतर विविध देशांमध्ये त्याचे रुग्ण आढळले आहेत. हा विषाणू सहसा हवेतून पसरणारा नसला, तरी त्याचा मृत्यूदर खूप जास्त आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT