Gyanesh Kumar Resignation Pudhari
राष्ट्रीय

CJP Protest: राजकीय वातावरण तापलं! राजीनामा न दिल्यास देशभर आंदोलन; SIR थांबवण्यासह 3 मोठ्या मागण्या, ‘जंतर-मंतर 2.0’चीही घोषणा

Gyanesh Kumar Resignation: कॉकरोच जनता पार्टीने (CJP) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.

Rahul Shelke

Gyanesh Kumar Resignation: कॉकरोच जनता पार्टीने (CJP) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ज्ञानेश कुमार यांनी 48 तासांत राजीनामा न दिल्यास निवडणूक आयोगाविरोधात देशभर आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला.

CJPने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा, आगामी निवडणुकांना स्थगिती आणि मतदार यादीतील बदलांशी संबंधित SIR प्रक्रिया थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयुक्तांना कायदेशीर संरक्षण देणाऱ्या 2023च्या कायद्यात बदल करण्याची मागणीही पक्षाने केली आहे.

CJPच्या तीन प्रमुख मागण्या

पहिली मागणी म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्याविरोधात चौकशी करण्यात यावी, अशी CJPची भूमिका आहे. कोणाच्या निर्देशानुसार निर्णय घेतले गेले, याचीही चौकशी करण्याची मागणी दीपके यांनी केली.

दुसऱ्या मागणीत आगामी सर्व निवडणुकांना तात्पुरती स्थगिती देऊन जानेवारी 2024 मधील मतदार यादी पुनर्स्थापित करावी आणि SIR प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. SIRशी संबंधित कागदपत्रे आणि फाइल्स सुरक्षित ठेवण्याची मागणीही CJPने केली आहे.

तिसरी मागणी निवडणूक आयुक्तांना कायदेशीर संरक्षण देणाऱ्या 2023च्या कायद्यात बदल करून नव्या कायद्यात नागरी समाजाच्या सहभागाची तरतूद करण्याची आहे.

अभिजीत दीपके यांचे गंभीर आरोप

पत्रकार परिषदेत अभिजीत दीपके यांनी ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर लोकशाही आणि मतदानाच्या अधिकाराबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

दीपके यांनी विविध निवडणुकांमधील मतदारसंघ आणि मतदार यादीतील बदलांचा संदर्भ देत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.

निवडणूक आयोगातील मतभेदाच्या वृत्तानंतर वाद

CJPच्या आंदोलनामागे 'द इंडियन एक्सप्रेस'च्या रिपोर्टची पार्श्वभूमी आहे. या अहवालानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या 10 महिन्यांत निवडणूक आयोगाच्या काही निर्णयांवर किमान 14 वेळा आक्षेप नोंदवले होते. SIR, मतदारांची नावे वगळणे, Form 6 मधील बदल आणि मतदार यादीशी संबंधित काही निर्णयांचा त्यात समावेश असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

मात्र, निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळले आहेत. आयोगाच्या म्हणण्यानुसार, सदस्यांकडून वेगवेगळी मते, सूचना किंवा तांत्रिक निरीक्षणे मांडली जाणे हा निर्णयप्रक्रियेचा भाग आहे. आयोगाने स्पष्ट केले की SIRसह सर्व निर्णय आयोगाच्या सर्वानुमते घेण्यात आले आहेत.

आता 'जंतर-मंतर 2.0'ची घोषणा?

CJPने 48 तासांची मुदत दिल्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही तर देशभर 'इलेक्शन कमिशन ठीक करो' अभियान सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर दिल्लीत 'जंतर-मंतर 2.0' आंदोलन उभारण्याची घोषणाही CJPकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, SIRच्या मुद्द्यावरून काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेससह काही विरोधी पक्षांनीही निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे मतदार यादी, SIR प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेवरून राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT