नवी दिल्ली : देशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये १०० टक्के फेरफार (रिंगिंग) होत असल्याचा दावा करत, ही केवळ निवडणुकीतील गडबड नसून संविधानावर, कायद्याच्या चौकटीवर केलेला हल्ला आहे, म्हणजेच देशद्रोह आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर ‘देशद्रोह’ केल्याचा थेट आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. येथे आयोजित पत्रकार परिषदेत भारतातील निवडणूक प्रक्रियेवर अत्यंत गंभीर आरोप करत मुख्य आयुक्तांनी तत्काळ राजीनामा देत माफीचा साक्षीदार बनावे असे आवाहन केले.
इंदिरा भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे जुने व्हिडीओ दाखवले. ते म्हणाले, कोणत्याही लोकशाहीत सत्ताविरोधी लाट (अँटी-इन्कम्बन्सी) अपरिहार्य असते. अगदी बांगला देश युद्ध जिंकल्यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही तीव्र जनविरोधाला सामोरे जावे लागले होते. मात्र, उत्तर कोरिया किंवा सद्दाम हुसेन यांच्या इराकप्रमाणे भारतात ही लाट पूर्णपणे कशी गायब होऊ शकते? हा मोठा प्रश्न आहे. देशात निवडणुका निष्पक्ष पद्धतीने होत नसल्यामुळेच असा प्रकार घडत असल्याचा निष्कर्ष त्यांनी मांडला.
निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत आयोगाच्या विविध निर्णयांवर किमान १४ वेळा औपचारिक आक्षेप नोंदवले आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी म्हणाले, खुद्द इतर दोन आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. हे पुरावे आमच्या आरोपांना पुष्टी देतात. ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार होऊन या प्रकरणाची सत्यता समोर आणावी, असे आवाहनही त्यांनी केले.
मतांचे रक्षण करणे ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत गांधी म्हणाले, मतचोरीतून कायदा चोरी आणि त्यातून संस्था चोरी जन्माला येते. जर जनतेचे मतच सुरक्षित नसेल तर संसदेत बसलेले खासदार चोरीच्या मतांवर निवडून आले आहेत, असाच याचा अर्थ होतो. मतांचे अस्तित्व नष्ट झाल्यास देशाचे संविधान, कायदे आणि लोकशाही संरचना नष्ट होईल, असा इशारा देत त्यांनी या षड्यंत्राची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली.
निवडणुकांत फेरफार : राहुल गांधी यांनी देशातील सर्व लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये १०० टक्के फेरफार झाल्याचा दावा केला.
देशद्रोहाचा आरोप व राजीनाम्याची मागणी : पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना ‘देशद्रोही’ म्हणत आयुक्तांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली.
आयोगातील दुफळी : दोन निवडणूक आयुक्तांनी गेल्या १० महिन्यांत १४ वेळा घेतलेल्या निर्णयांवर लेखी आक्षेप नोंदवल्याचा अहवाल राहुल गांधींनी मांडला.
संविधानावर घाला : मतचोरीमुळे लोकशाहीचा मूळ ढाचा आणि संविधान धोक्यात आल्याचा गंभीर इशारा त्यांनी दिला.