Gwalior Zoo Missing Woman Case Pudhari
राष्ट्रीय

Zoo Missing Woman Case: प्राणिसंग्रहालयात पती दुचाकी पार्क करायला गेला अन् पत्नी बेपत्ता, २० दिवसांनी सापडली; नेमकं काय घडलं?

Gwalior Zoo Missing Woman Case: प्राणिसंग्रहालयात पतीसोबत आलेली १८ वर्षीय विवाहित महिला अचानक बेपत्ता झाली होती. तब्बल २० दिवसांच्या शोधानंतर पोलिसांनी तिला शोधून काढले.

Rahul Shelke

Gwalior Zoo Missing Woman Case: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीसोबत प्राणिसंग्रहालयात फिरायला आलेली १८ वर्षीय विवाहित महिला अचानक बेपत्ता झाली होती. तब्बल २० दिवसांच्या शोधानंतर पोलिसांनी या महिलेला शोधून काढले आहे. सुरुवातीला महिला बेपत्ता झाल्यामुळे तिच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

आता महिला सापडल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. महिलेने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ती रस्ता चुकली होती आणि त्यानंतर तिने एका व्यक्तीकडून लिफ्ट घेतली होती. मात्र, या काळात नेमके काय घडले, याचा तपास पोलीस करत आहेत.

पती दुचाकी पार्क करायला गेला अन् पत्नी झाली बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील नरवर परिसरात राहणारा एक तरुण आपल्या पत्नीला फिरवण्यासाठी आणि नातेवाइकांची भेट घडवून आणण्यासाठी ग्वाल्हेरला आला होता. यावेळी दोघांनी ग्वाल्हेरच्या प्राणिसंग्रहालयाला भेट देण्याचे ठरवले.

प्राणिसंग्रहालयात पोहोचल्यानंतर पती दुचाकी पार्क करण्यासाठी गेला. काही वेळाने तो परत आला, तेव्हा त्याची पत्नी तिथे नव्हती. त्याने परिसरात तिचा शोध घेतला. मात्र, ती कुठेच सापडली नाही. अखेर त्याने ग्वाल्हेरमधील पडाव पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

सीसीटीव्हीमध्ये दुसऱ्या व्यक्तीसोबत दिसली महिला

महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या फुटेजमध्ये महिला एका दुसऱ्या व्यक्तीच्या दुचाकीवरून जाताना दिसली. त्यानंतर महिलेच्या पतीने अरमान खान नावाच्या तरुणावर संशय व्यक्त केला.

२० दिवसांनंतर महिला सापडली; पोलिसांकडून चौकशी

सुमारे २० दिवसांच्या शोधानंतर पोलिसांनी महिलेला शोधून काढले. प्राथमिक चौकशीत महिलेने आपण रस्ता चुकल्याचे आणि त्यानंतर एका व्यक्तीकडून लिफ्ट घेतल्याचे सांगितले आहे.

या प्रकरणाची माहिती देताना सीएसपी रॉबिन जैन यांनी महिला सुरक्षित सापडल्याचे सांगितले. महिला प्रौढ असल्याने तिची इच्छा, तिचे म्हणणे आणि या काळात घडलेल्या घटनांची माहिती कायदेशीर प्रक्रियेनुसार तपासली जाणार आहे.

न्यायालयात नोंदवले जाणार महिलेचे म्हणणे

पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व घटनांची पडताळणी केली जात आहे. महिलेला न्यायालयात हजर करून तिचे म्हणणे नोंदवले जाणार आहे. तिच्या जबाबातून आणि तपासात समोर येणाऱ्या पुराव्यांतून पुढील घडामोडी स्पष्ट होतील. त्यानंतरच पोलीस पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT