ग्वाल्हेर; वृत्तसंस्था : यंदाच्या स्वातंत्र्यदिनी देशातील १८ राज्यांत ग्वाल्हेरच्या ‘मध्य भारत खादी संघ’मध्ये तयार झालेला तिरंगा फडकवला जाईल. चरख्यावर धागा बनवण्यापासून २५ कठीण चाचण्या व आयएसआय मार्क मिळण्यापर्यंत राष्ट्रध्वज कसा तयार होतो ते जाणून घ्या.
कर्नाटकनंतर ग्वाल्हेर हेच एकमेव अधिकृत केंद्र : स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिनी फडकवल्या जाणाऱ्या अधिकृत तिरंग्यांचा मोठा भाग ग्वाल्हेरमध्येच तयार होतो. देशात आयएसआय मार्क असलेले खादीचे तिरंगे बनवण्याचा अधिकार फक्त दोन संस्थांना मिळाला आहे, एक कर्नाटकातील हुबळी आणि दुसरे ग्वाल्हेर. ग्वाल्हेरमधील ध्वज मध्यप्रदेशशिवाय उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात व दक्षिण भारतापर्यंत पाठवले जातात.
हाताने धागा बनवण्यापासून शिलाई पर्यंतचा : ग्वाल्हेरमध्ये तिरंगा तयार करण्यासाठी ५ ते ६ दिवसांचा कालावधी लागतो. तेथे धागा तयार करण्यापासून ते विणकाम, रंगकाम व शिलाईपर्यंतचे सर्व काम कारागीर हातांनीच करतात. कापड तयार झाल्यानंतर त्याचे तिन्ही रंगा, शिलाईची मजबुती आणि अचूक माप यांची बारकाईने तपासणी होते. चाचण्यांत उत्तीर्ण झाल्यावरच त्यावर आयएसआयचा शिक्का मारला जातो.
ग्वाल्हेरच्या संस्थेची सुरुवात १९२५ मध्ये 'चरखा संघ' म्हणून झाली. पूर्वी तेेथे वर्षाला १० ते १२ हजार ध्वज तयार व्हायचे. हा आकडा वार्षिक ३० हजारांवर पोहोचला आहे. यंदा संस्थेने ७० लाखांहून अधिक मूल्याचे ध्वज पुरवले आहेत. ही संख्या गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी अधिक आहे.
स्वातंत्र्यदिनी देशभरात तिरंगा अभिमानाने लहरेल, तेव्हा त्यात ग्वाल्हेरच्या खादीचे कौशल्य स्पष्ट दिसून येईल. लाल किल्ल्यापासून १८ राज्ये व सैन्याच्या तळांपर्यंत यावेळी ग्वाल्हेरमध्ये निर्मित तिरंग्याची शान पाहायला मिळेल. सरकारी नियमांनुसार राष्ट्रध्वज बनवण्याची परवानगी फक्त दोनच ठिकाणांना आहे. यात उत्तर भारतात फक्त ग्वाल्हेरचा 'मध्य भारत खादी संघ' हे काम करतो. यावेळी १९६ कारागिरांनी रात्र-दिवस मेहनत करून तयार केलेले ध्वज २० ते २५ प्रकारच्या कडक तपासण्यांनंतरच बाहेर पाठवले जातात.