अहमदाबाद ः गुजरातमधील एका 15 वर्षीय बलात्कार पीडिता अल्पवयीन मुलीने गर्भपाताची परवानगी मागणार्या याचिकेवर सुनावणी सुरू असतानाच मुलीला जन्म दिला. या घटनेमुळे गुजरात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला या अल्पवयीन आई आणि तिच्या नवजात बालिकेच्या सहा महिन्यांच्या सर्व खर्चाची जबाबदारी घ्यावी, असे निर्देश दिले आहेत.
अहमदाबादमधील या मुलीच्या वडिलांनी मुलगी 35 आठवड्यांची गर्भवती असताना तिला गर्भपाताची परवानगी मिळावी म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचबरोबर त्यांनी 24 ऑक्टोबर रोजी मांडल पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने सोला सिव्हिल हॉस्पिटलला मुलीची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश दिले. पण त्यांचा अहवाल येण्यापूर्वीच मुलीने बालिकेला जन्म दिला. ही अल्पवयीन मुलगी 25 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल झाली होती आणि 28 ऑक्टोबरच्या दुपारी तिने 2.2 किलो वजनाच्या बालिकेला जन्म दिला. वैद्यकीय अहवालानुसार आई आणि नवजात बालिका दोघेही सध्या स्वस्थ आहेत. न्यायालयाने नमूद केले की, गर्भपाताबाबतची याचिका आता ‘निरर्थक’ ठरते. कारण प्रसव झाला आहे.
राज्य सरकारने अल्पवयीन आई आणि बालिकेच्या सहा महिन्यांच्या सर्व वैद्यकीय आणि देखभालीच्या खर्चाची जबाबदारी घ्यावी.
अहमदाबाद जिल्ह्याचे तपास अधिकारी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी आई आणि मुलीच्या पुनर्वसनाची जबाबदारी घ्यावी.
अल्पवयीन मुलगी आपल्या मुलीला दत्तक देऊ इच्छित असल्यास त्या बालिकेला अहमदाबादमधील अधिकृत दत्तक संस्थेकडे सोपवावे.
दोघांच्या आरोग्य तपासण्या नियमितपणे कराव्यात आणि बालकल्याण समितीने त्यांचे निरीक्षण करावे.
अल्पवयीन मुलीला आपल्या कुटुंबासोबत राहायचे नसल्यास तिच्यासाठी अहमदाबादमधील महिला निवारा केंद्रात राहण्याची व तिच्या शिक्षण, प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने तात्पुरते आर्थिक सहाय्य देण्याची खात्री करावी.