Gujarat Hooch Tragedy pudhari
राष्ट्रीय

Gujarat Hooch Tragedy: दारू बंदी असलेल्या गुजरातमध्ये निवृत्त पोलिसाची 'ओली' पार्टी जिवावर बेतली; एकूण ६ जणांचा मृत्यू

Anirudha Sankpal

Gujarat Hooch Tragedy Bhavnagar: गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात मिथेनॉल मिश्रित दारू पिल्यामुळं ६ लोकांचा मृत्यू झाला असून २५ जणांना रूग्णालयात दाखल करावं लागलं आहे. विशेष म्हणजे दारू बंदी असलेल्या गुजरातमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारू कशी मिळाली अन् याबाबत पोलिसांनी याची दखल घेण्यास उशीर का झाला याबाबत आश्चर्य व्यक्त केल जात आहे. आता हे प्रकरण स्टेट मॉनिटरिंग सेल (SMC) कडे तपासासाठी वर्ग करण्यात आलं आहे.

२५ वर्षाचा उपेंद्रसिंह गोहीलचा यांचा भावनगरमधील सर टी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं. उपेंद्रसिंह हा घोघा तालुक्यातील खारखडी गावाचा रहिवासी असून तो रविवारी रात्री मित्र हरपालसिंह गोहील आणि विश्वराज सिंह गोहील यांच्यासह एका पार्टीला गेला होता. तिथं त्याने भारतीय बनावटीची विदेशी दारू (IMFL) प्यायली होती. विश्वराज सिंह हे पोलीस दलातून निवृत्त झाले होते त्याची ही पार्टी होती. विश्वराज सिंह यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्यांना भावनगरमधील अरहम रूग्णालयात दाखल केलं आहे.

इतर गंभीर झालेले लोकं हे भावनगरच्या वेगवेगळ्या भागातील आहेत. तपासात या सर्वांनी एकाच अवैध दारू विक्रेत्याकडून ही दारू विकत घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अनेक रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असून त्यांची दृष्टी देखील गेली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या रूग्णांना यकृताबाबतची समस्या उद्भवू शकते असा इशारा देखील दिला आहे.

भावनगर जिल्हाधिकारी मनिष कुमार बंसल यांनी बुधावारी सांगितलं की प्रशासनाला या घटनेबाबतची माहिती मंगळवारी सांयकाळी ६ वाजता मिळाली. त्यानंतर प्रभावित झालेल्या लोकांना जिल्ह्यातील इतर भागात शोधण्यात आलं. त्यातील दोन मृत व्यक्तींची ओळख पटली असून एक ४० वर्षाचे कार्तिक मखवाना आहेत तर दुसऱ्या व्यक्तीचे नाव घनश्यामसिंह जडेजा (५० वर्षे) असं आहे.

तसेच मूळचे मध्य प्रदेशचे नरेंद्र यादव यांच्या मृत्यूचे देखील या बनावट दारूशी कनेक्शन आहे का याची तपासणी केली जात आहे. त्यांच्यावर या बनावट दारू तयार करण्यामध्ये त्यांचा देखील सहभाग असल्याचा आरोप आहे.

स्टेट मॉनिटरिंग सेलचे एसपी मयूर छावडा यांनी बुधावारी सायंकाळी सांगितलं की एजन्सीने तपास आपल्या हातात घेतला आहे. छावडा यांनी पुढे सांगितलं की ही दारू भावनगरमध्येच तयार करण्यात आली आणि भावनगरमध्येच विकली गेली. या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात देखील घेतलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT