अहमदाबाद : पत्नीने कल्पना न देता माहेरी मुक्काम केल्यावर पतीने रागाच्या भरात तिला एकदा थप्पड मारणे, हे भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८-अ अंतर्गत 'क्रूरते'च्या व्याख्येत बसत नाही, असा ऐतिहासिक निकाल गुजरात उच्च न्यायालयाने दिला आहे. या निकाला सोबतच २३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एका आत्महत्या प्रकरणातून पतीची निर्दोष मुक्तता केली आहे.
न्यायमूर्ती गीता गोपी यांच्या खंडपीठाने हा निकाल देताना स्पष्ट केले की, पती-पत्नीमधील सामान्य घरगुती वाद किंवा एखादी किरकोळ मारहाणीची घटना म्हणजे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे (कलम ३०६) किंवा छळ करणे असे मानले जाऊ शकत नाही.
अपीलकर्ते दिलीपभाई वारली यांचा विवाह ११ मे १९९६ रोजी प्रमिला यांच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या एका वर्षातच प्रमिला यांनी शेतातील झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले. याप्रकरणी पोलिसांनी दिलीपभाई यांच्यावर शारीरिक व मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. २० मे २००३ रोजी वलसाड जिल्हा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला दिलीपभाई यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
बचाव पक्षाचे ज्येष्ठ वकील धवल व्यास यांनी असा युक्तिवाद केला की, पती-पत्नीमधील वाद अत्यंत किरकोळ स्वरूपाचे होते. दिलीपभाई एका कंपनीत कामाला होते आणि अतिरिक्त उत्पन्नासाठी रात्री संगीताच्या कार्यक्रमात 'बँजो' वाजवायला जात असत. पती रात्री उशिरा घरी येत असे, ही बाब पत्नीला आवडत नसे. यावरून त्यांच्यात केवळ शाब्दिक चकमक होत असे. यात कोणताही गुन्हेगारी हेतू किंवा हुंड्याची मागणी नव्हती.
न्यायमूर्ती गीता गोपी यांच्या खंडपीठाने पुराव्यांचे सूक्ष्म विश्लेषण केले. त्यांनी या प्रकरणाची सुनावणी करताना सांगितले की, ‘पतीकडून सातत्याने आणि असह्य मारहाण होत असल्याच्या आरोपांना पुष्टी देण्यासाठी ठोस पुराव्यांची आवश्यकता असते. अशा पुराव्यांअभावी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही.’ न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, साक्षीदार क्रूरता आणि आत्महत्येची चिथावणी सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहेत, त्यामुळे सत्र न्यायालयाची शिक्षा कायम राहू शकत नाही.
बचाव पक्षाचे ज्येष्ठ वकील धवल व्यास यांनी असा युक्तिवाद केला की, आरोप अत्यंत सामान्य स्वरूपाचे होते. पती रात्रीच्या वेळी अतिरिक्त उत्पन्नासाठी 'बँजो' वाजवायला जात असे, जे पत्नीला आवडत नसे. याच कारणावरून त्यांच्यात किरकोळ वाद होत असत.
सरकारी वकील ज्योती भट्ट यांनी पीडितेच्या पालकांच्या साक्षीचा दाखला देत छळाचा दावा केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने असे नमूद केले की,
चपराक म्हणजे क्रूरता नव्हे : पत्नीने पूर्वकल्पना न देता रात्रभर माहेरी मुक्काम केल्याने पतीने तिला मारलेली चपराक ही आयपीसी कलम ४९८-अ नुसार 'क्रूरता' मानली जाऊ शकत नाही.
पुराव्यांचा अभाव : मृत पत्नीवर सतत अत्याचार होत होते, हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही वैद्यकीय पुरावे किंवा हॉस्पिटलचे रेकॉर्ड उपलब्ध नव्हते.
तक्रारीचा अभाव : पीडितेने हयात असताना हुंडाबळी किंवा छळाबाबत पोलिसांत कधीही कोणतीही तक्रार नोंदवली नव्हती.
सामान्य वैवाहिक तणाव : मृत विवाहितेच्या वडिलांनीही साक्ष दिली की, पती उशिरा घरी येत असे, या कारणावरून त्यांच्यात किरकोळ वाद होत असत. मात्र, केवळ अशा वादांमुळे कोणी आत्महत्येस प्रवृत्त झाले असे म्हणता येणार नाही.
सततच्या जाचाचे ठोस पुरावे असल्याशिवाय, संसारातील साध्या भांडणांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा मानता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले.
न्यायालयाने पुनरुच्चार केला की, कलम ३०६ अंतर्गत दोषसिद्धीसाठी स्पष्ट 'गुन्हेगारी हेतू' आणि आत्महत्येसाठी प्रत्यक्ष किंवा निकटची चिथावणी असणे आवश्यक आहे. सामान्य वैवाहिक वादांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे मानले जाऊ शकत नाही. या तथ्यांच्या आधारे, उच्च न्यायालयाने पतीचे अपील स्वीकारून सत्र न्यायालयाची शिक्षा रद्दबातल ठरवली.