Girnar Hill Gorakhnath Temple Vandalism
नवी दिल्ली : गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील गिरनार पर्वतावर असलेल्या गोरखनाथ मंदिरात अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली असून, मूर्तीचीही विटंबना केली आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. मंदिरात झालेल्या या तोडफोडीमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप असून त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. संगमरवरी मूर्तीचं शीर तोडण्यात आलं असून, मंदिराच्या काचेच्या दरवाजासह इतर वस्तूंचंही नुकसान करण्यात आलं आहे.
गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील गिरनार पर्वतावर असलेल्या भगवान गोरखनाथांच्या मंदिरात अज्ञात लोकांनी तोडफोड केली. गोरखनाथ हे हिंदू धर्मातील एक पूज्य योगी आणि नाथ संप्रदायाचे संस्थापक मानले जातात. १,११७ मीटर उंचीवरील शिखरावर असलेल्या या मंदिरात झालेल्या तोडफोडीबद्दल भाविकांमध्ये प्रचंड रोष आहे. लोकांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जुनागढचे पोलीस अधीक्षक सुबोध ओडेदरा यांनी सांगितलं की, गिरनार पर्वतावरील मंदिरात गुरु गोरखनाथांच्या मूर्तीची शनिवारी रात्री उशिरा तोडफोड करण्यात आली. तक्रार मिळाल्यानंतर पोलीसांनी तपास सुरू केला आहे.
या पर्वताला रेवतक पर्वत असेही म्हणतात. यावर जैन आणि हिंदू मंदिरं आहेत. भाविकांना शिखरावर पोहोचण्यासाठी १०,००० दगडांच्या पायऱ्या चढाव्या लागतात. या पर्वतावर जैन मंदिरं अंदाजे दोन-तृतीयांश उंचीवर आहेत. यातील सर्वात मोठं आणि जुनं १२ व्या शतकातील नेमिनाथ मंदिर आहे, जे २२ व्या तीर्थंकरांना समर्पित आहे. या पर्वतावर अनेक हिंदू मंदिरं आहेत, त्यात देवी अंबा मातेच एक प्रसिद्ध मंदिरही आहे.