पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आनंद जिल्ह्यातील खंभात भागात मोठी कारवाई केली. एटीएसने एका औषध उत्पादन ठिकाणावर छापा टाकून पाच जणांना अटक केली. याबाबतची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. या छाप्यादरम्यान अनेक कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असल्याची पुष्टी एटीएसचे उपमहानिरीक्षक (डीआयजी) सुनील जोशी यांनी केली.
दरम्यान, गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "एटीएसने पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईत झोपेच्या गोळ्या बनवण्यासाठी वापरली जाणारी १०७ किलोपेक्षा जास्त पावडर जप्त केली आहे."
गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आनंद जिल्ह्यात अल्प्राझोलम नावाच्या पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. यावेळी एटीएसने १०७ कोटी रुपये किमतीच्या बंदी असलेल्या औषधांसह ५ जणांना अटक केली आहे.
अल्प्राझोलमचा नशेसाठी गैरवापर केला जात असल्याने ते नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्याच्या कक्षेत येते. सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स (CBN) कडून अल्प्राझोलम उत्पादनासाठी परवाना दिला जातो. दरम्यान, एटीएसच्या छाप्यादरम्यान संशयित आरोपींकडे परवाना मागितला असता, त्यांच्याकडे तो नव्हता. यावेळी पाचजण युनिट चालवत होते, तर सहावा व्यक्ती रिसीव्हर होता. प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की पाचही आरोपींनी सायकोट्रॉपिक पदार्थ तयार करण्यासाठी कारखाना भाड्याने घेतला होता.
नोव्हेंबर २०२४ च्या सुरुवातीला गुजरात एटीएसने एका व्यक्तीला अटक केली होती. पाकिस्तानी एजंटशी तटरक्षक दलाच्या जहाजांच्या हालचालींबद्दल माहिती शेअर केल्याचा त्याच्यावर आरोप होता.