चंदीगड; वृत्तसंस्था : पंजाबमधील मंडी गोबिंदगड येथे केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) आयुक्तालयाने एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. लोह आणि पोलाद क्षेत्रात बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मिळवून सरकारला कोट्यवधींचा चुना लावणार्या एका सिंडिकेटचा भांडाफोड करत अधिकार्यांनी दोघांना अटक केली आहे. या घोटाळ्यामुळे सरकारी तिजोरीला तब्बल 47 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
260 कोटींची बोगस बिले, दोघांना बेड्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात तब्बल 260 कोटी रुपयांची बोगस बिल तयार केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सरकारचे 47 कोटी रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी पाच बनावट कंपन्या चालवणार्या आणि संपूर्ण सिंडिकेट नियंत्रित करणार्या दोन प्रमुख व्यक्तींना 24 जुलै रोजी अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात आणखी काहीजण सामील असण्याची शक्यता असून तपास अधिक वेगाने सुरू आहे. प्रामाणिक करदात्यांना योग्य संधी मिळावी आणि करचोरीला आळा घालण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासन सीजीएसटी लुधियाना आयुक्तालयाने दिले आहे.
सीजीएसटी लुधियानाच्या अधिकार्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मंडी गोबिंदगडमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. तपासात एक धक्कादायक पद्धत समोर आली. घोटाळेबाज प्रथम कर्जबाजारी किंवा बंद पडलेल्या रोलिंग मिल्स (लोखंडाच्या कंपन्या) विकत घेत. त्यानंतर या कंपन्यांच्या नावाखाली बनावट बिले तयार करून खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले जात होते आणि ते पुढे इतर कंपन्यांना दिले जात होते. यामुळे ते जीएसटी अधिकार्यांच्या नजरेतून वाचत होते.