GST Savings Festival | देशभर ‘जीएसटी बचत महोत्सव‌’ दणक्यात सुरू Pudhari File Photo
राष्ट्रीय

GST Savings Festival | देशभर ‘जीएसटी बचत महोत्सव‌’ दणक्यात सुरू

सणासुदीत खरेदीची ‘बंपर’ लॉटरी! कंपन्यांकडून किमतीत मोठी घट

पुढारी वृत्तसेवा

मुंबई /नवी दिल्ली; वृत्तसंस्था : येत्या सणासुदीच्या हंगामात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि मंदावलेल्या मागणीला चालना देण्यासाठी भारतीय उद्योगजगताने कंबर कसली आहे. वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती कमी केल्या. जीएसटी सुधारणा देशभर सोमवारपासून लागू झाल्या. त्याला व्यापारी जगताने मोठ्या उत्साहात सकारात्मक प्रतिसाद दिला. काही कंपन्यांनी तर जीएसटी कपातीपेक्षाही जास्त सवलत देऊ केली आहे, ज्यामुळे सणासुदीच्या काळात बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड उडेल आणि अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना थेट पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी, ‘नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणां’मुळे सामान्य नागरिकांची वार्षिक सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांची बचत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

किंमत कपातीसाठी कंपन्यांची धावपळ

जीएसटी परिषदेने 3 सप्टेंबर रोजी विविध वस्तूंवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतल्यापासून कंपन्यांनी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. सरकारच्या निर्देशांनुसार, वितरकांना नवीन किमती कळवण्यात आल्या आहेत, कंपन्यांच्या वेबसाईटवर जुन्या आणि नवीन किमतींची सविस्तर यादी प्रसिद्ध केली जात आहे आणि कारखान्यांमध्ये नवीन एमआरपी असलेल्या पॅकिंगचे उत्पादन वेगाने सुरू

आहे. आईस्क्रीम पार्लर, किराणा दुकाने, पादत्राणांची शोरुम्स, तसेच गृहोपयोगी वस्तू आणि वाहन कंपन्यांनी आपल्या उत्पादनांना नवीन किमतीचे टॅग लावले आहेत.

उद्योगजगतात उत्साहाचे वातावरण

या निर्णयामुळे उद्योगजगतात उत्साहाचे वातावरण आहे. ‘शॉपर्स स्टॉप’चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक कविंद्र मिश्रा म्हणाले, ज्या ब्रँडस्वरील जीएसटी कमी झाला आहे, त्यांनी आमच्या स्टोअर्समध्ये किमती आधीच कमी केल्या आहेत. आता दसरा आणि दिवाळीच्या विक्रीसाठी आम्ही सज्ज आहोत. ‘बस्किन रॉबिन्स’ चालवणार्‍या ग्रॅव्हिस फूडस्चे सीईओ मोहित खट्टर यांच्या मते, ग्राहकांना सरासरी 10 ते 11 टक्के बचत अपेक्षित आहे.

मागणी वाढीची मोठी अपेक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात जीएसटी कपातीचे संकेत दिल्यानंतर काही काळासाठी वाहन आणि गृहोपयोगी वस्तूंच्या विक्रीत घट झाली होती. मात्र, आता कंपन्यांना विश्वास आहे की, सणासुदीच्या काळात ही घट भरून निघेल. यावर्षी उन्हाळा थंड गेल्याने विक्री कमी झाली होती. आता कर कपातीमुळे विक्रीला मोठी चालना मिळेल, असे ‘ब्ल्यू स्टार’चे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन म्हणाले.

कंपन्यांना विक्री वाढण्याची खात्री असल्याने त्या जीएसटी कपातीपेक्षा जास्त सवलत देत आहेत, असे ‘रसना ग्रुप’चे अध्यक्ष पिरुझ खंबाटा यांनी नमूद केले. ‘गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस्’चे सीईओ सुधीर सीतापती यांच्या मते, ही मागणीला चालना देणारी अत्यंत आवश्यक बाब आहे. ग्राहक या बचतीचा उपयोग इतर वस्तूंच्या खरेदीसाठी करतील.

एकंदरीत, सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांना सणासुदीच्या खरेदीत मोठा दिलासा मिळणार आहे, तर कंपन्यांना वाढीव विक्रीतून अर्थचक्राला गती देण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे येणारा सणासुदीचा हंगाम ग्राहक आणि उद्योगजगत दोघांसाठीही ‘बंपर’ ठरेल, अशी चिन्हे आहेत.

प्रमुख कंपन्या आघाडीवर

पार्ले प्रॉडक्टस् कंपनीचे उपाध्यक्ष मयंक शाह यांनी सांगितले की, 7,000 हून अधिक वितरकांना नवीन किमती कळवण्यात आल्या असून, सर्व उत्पादने नवीन एमआरपीसह बाजारात दाखल झाली आहेत.

आयटीसी : सुमारे 70 लाख दुकानांपर्यंत पोहोचणारी आयटीसी कंपनीदेखील आपल्या विक्रेत्यांना नवीन किमतींबद्दल माहिती देत आहे. काही काळ बाजारात जुन्या आणि नवीन दोन्ही किमतींची उत्पादने उपलब्ध असू शकतात, असे कार्यकारी संचालक हेमंत मलिक यांनी स्पष्ट केले.

लिबर्टी शूज : कंपनीचे कार्यकारी संचालक अनुपम बन्सल म्हणाले, आम्ही 3,000 रुपयांपर्यंतच्या पादत्राणांच्या किमती 500 रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. यामुळे ग्राहक नॉनब्रँडेड वस्तूंऐवजी ब्रँडेड वस्तूंकडे वळतील, अशी अपेक्षा आहे.

मदर डेअरी आणि रिलायन्स : अगदी 5 आणि 10 रुपयांच्या वस्तूंवरही 0.50 पैसे ते 1 रुपयापर्यंतची कपात केली जात आहे. यूपीआय पेमेंटमुळे सुट्ट्या पैशांची समस्या येणार नाही. पनीरसारख्या उत्पादनांचे नवीन किमतीसह उत्पादन सुरू झाले आहे, असे मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बंडलिश यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT