नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) सुधारणांनंतर केंद्रीय अर्थमंत्रालयाने निवडक ५४ वस्तूंचे बारकाईने निरीक्षण केले. त्यात दिसून आले की, जीएसटी सुधारणांचा फायदा अंतिम ग्राहकांना मिळत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शनिवारी (दि.१८) केले.
'जीएसटी बचत उत्सव' निमित्त दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या की, जीएसटी सुधारणांमुळे काही वस्तूंचे दर अपेक्षेपेक्षा जास्त कमी झाले आहेत. त्या म्हणाल्या की, जीएसटी सुधारणा भारतातील लोकांनी स्वीकारल्या आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हे देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री पियूष गोयल म्हणाले की, जीएसटी सुधारणांचा परिणाम गुंतवणूक, व्यवसाय आणि उद्योगात दिसून येत आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत भर पडली असून ग्राहकांच्या खर्चात वाढ झाली आहे. जीएसटी सुधारणांमुळे प्रत्येक कुटुंबासाठी दिलासा आणि समृद्धीचा दुहेरी धमाका मिळाला आहे. सुधारणांमुळे नवरात्रीत ऐतिहासिक वाहन विक्री झाली. मारुती, महिंद्रा आणि टाटाने वाहन विक्रीत नवीन बेंचमार्क स्थापित केले, असे गोयल म्हणाले. आरोग्य आणि जीवन विमा, जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी केल्याने नागरिकांसाठी मोठा दिलासा मिळाला असल्याचे गोयल म्हणाले.
केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, जीएसटी सुधारणांमुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची प्रचंड विक्री आणि दुप्पट उत्पादन वाढ झाली. वाढता वापर आणि गुंतवणूक जीएसटी सुधारणांची ताकद दर्शवते. वस्तुंच्या वाढत्या मागणीमुळे २५ लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात तेजी आली आहे. वैष्णव यांनी माहिती दिली की, या वर्षीच्या नवरात्र हंगामात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात विक्रमी विक्री झाली, गेल्या वर्षीच्या तुलनेत २०-२५% वाढ झाली. टेलिव्हिजन आणि वॉशिंग मशीनपासून स्मार्टफोन आणि एअर कंडिशनरपर्यंत वस्तूंची प्रचंड विक्री झाली. उल्लेखनीय म्हणजे, ८५-इंच टेलिव्हिजन पूर्णपणे विकले गेले आणि अनेक कुटुंबांनी त्यांची उपकरणे नवीन मॉडेलमध्ये अपग्रेड केली, असे वैष्णव म्हणाले.