नवी दिल्ली : जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी रात्री 10 वाजता केली. घटस्थापनेपासून (22 सप्टेंबर) देशभरात वस्तू आणि सेवांवर 5 टक्के आणि 18 टक्के अशा दोन मुख्य दरांची नवीन करप्रणाली लागू केली जाईल. दूध, पनीर आणि अनेक जीवनावश्यक वस्तू करमुक्त करण्यात आल्या आहेत. सिमेंट, टी.व्ही., फ्रिज, एसी, दुचाकी आणि चारचाकी वाहने स्वस्त झाल्याने जनतेची यंदा दसरा-दिवाळी गोड होणार आहे. जीएसटी कौन्सिलच्या या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला मोठा बूस्ट मिळेल, असे सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नव्या कर संरचनेनुसार, टी.व्ही. आणि वाहनांच्या सुट्या भागांवर कर 18 टक्के द्यावा लागेल. सर्व प्रकारच्या टेलिव्हिजन संचांवर आता 18 टक्के जीएसटी लागेल. तसेच, सर्व प्रकारच्या ऑटो पार्टस् आणि तीनचाकी वाहनांवरही 18 टक्के कर लावण्यात येईल. नमकीन, सॉस, पास्ता, चॉकलेट, बटर आणि तूप यासारख्या वस्तूंवरील कर 12 टक्के किंवा 18 टक्क्यांवरून थेट 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. कर्करोगावर वापरल्या जाणार्या जीवनावश्यक औषधांवरील कर आता ‘शून्य’ करण्यात आला आहे, ज्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सांगितले की, हे सर्व निर्णय एकमताने घेण्यात आले असून, सर्व राज्यांनी कर दरात बदल करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
या कररचनेमुळे सरकारी तिजोरीत अंदाजे 48,000 कोटी रुपयांचा महसूल वाढेल, असा अंदाज महसूल सचिव अजय श्रीवास्तव यांनी व्यक्त केला. तसेच, ही नवीन करप्रणाली आर्थिकद़ृष्ट्या शाश्वत असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जीएसटी कौन्सिलची ही 56 वी बैठक तब्बल साडेदहा तास चालली. यामध्ये केंद्र आणि राज्यांनी अनेक महत्त्वाच्या कर प्रस्तावांवर सहमती दर्शविली.
औषधे : कर्करोग आणि दुर्मीळ आजारांवरील उपचारांसह 33 जीवनावश्यक औषधे.
विमा : वैयक्तिक जीवन विमा आणि आरोग्य विमा पॉलिसी.
शैक्षणिक साहित्य : नकाशे, चार्ट, ग्लोब, पेन्सिल, शार्पनर, क्रेयॉन, पेस्टल, वह्या, नोटबुक, खोडरबर.
दैनंदिन आणि आरोग्यविषयक वस्तू
वैयक्तिक काळजी : केसांचे तेल, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट सोप, टूथब्रश, शेव्हिंग क्रीम.
खाद्यपदार्थ : लोणी, तूप, चीज, डेअरी स्प्रेडस्, नमकीन.
घरगुती आणि शिशू उत्पादने : भांडी, बाटल्या, डायपर.
वैद्यकीय उपकरणे : थर्मामीटर, वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजन, निदान किट, ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्स.
इतर : चष्मे, शिवणयंत्र आणि त्यांचे भाग.
उपकरणे : एअर कंडिशनर, दूरदर्शन संच, डिशवॉशर.
वाहने : लहान कार, 350 सी.सी.पेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी, बस, ट्रक, रुग्णवाहिका.
इतर : ऑटो पार्टस्, तीनचाकी वाहने, सिमेंट.
हानिकारक आणि चैनीच्या वस्तू
तंबाखू उत्पादने : पानमसाला, सिगारेट, गुटखा, चघळण्याचा तंबाखू, बिड्या.
पेये : साखर किंवा फ्लेवर असलेली सोडा पेये, एनर्जी ड्रिंक्स, अल्कोहोल नसलेली पेये.
उच्च श्रेणीतील वाहने : 350 सी.सी.पेक्षा जास्त क्षमतेच्या मोटारसायकल, यॉट, खासगी हेलिकॉप्टर, जेट.
पनीर, चपाती, रोटी आणि पराठा यासारख्या वस्तूंना पूर्वी 5 टक्के कर लागत होता, तो आता पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे.
सिगारेट आणि पानमसाल्यासारख्या वस्तूंवर आता 40 टक्के असा सर्वाधिक कर लागेल.