GST New Slabs : जीएसटी काऊन्सीलनं नुकतेच जीएसटीचे नवे स्लॅब जाहीर केले. आधीच्या चार स्लॅब ऐवजी आता फक्त दोन स्लॅब केले असून यामुळं ग्राहकांसाठी अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. नव्या नियमानुसार आता ५ आणि १८ असे दोनच टॅक्स स्लॅब राहणार आहेत. मात्र यामध्ये एक मेख आहे. जरी या दोन स्लॅबमध्ये जवळपास सर्व वस्तू आणि सेवांचा समावेश केला असला तरी काही निवडक वस्तू आणि सेवांवर तब्बल ४० टक्के विशेष वस्तू आणि सेवा कर लावण्यात आला आहे.
या स्लॅबमध्ये लक्झरी अन् महागड्या गाड्या, तंबाखू आणि सिगारेट यांचा समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर जीएसटी काऊन्सीलनं कार्बोनेटेड ड्रिंक्सवरील कर २८ टक्क्यांवरून ४० टक्क्यावर नेला आहे. त्यामुळं प्रसिद्ध सॉफ्ट ड्रिंक्स तसेच कॅफिनेटेड ड्रिंक्स देखील महागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारनं आधीच मद्यावरचा कर वाढवला होता. आता जे मद्यपान करत नाहीत मात्र सॉफ्ट ड्रिंक्स घेऊन मद्यपींना कंपनी देतात त्यांच्या देखील खिशाला चाट बसणार आहे. यापूर्वी कॅरेमल पॉपकार्नवर देखील सरकारनं १८ टक्के जीएसटी लावला होता. त्यानंतर देखील याची जोरदार चर्चा झाली होती. आता सॉफ्ट ड्रिंक्सवर तब्बल ४० टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.
कॅफीनेटेड ड्रिंक्स
केंद्र सरकारनं ज्या पेयांमध्ये कार्बन डाय ऑक्साईड मिक्स केला जातो त्यावर ४० टक्के जीएसटी लावला आहे. त्यामुळे प्रसिद्ध कोल्ड ड्रिंक्स, नॉन अल्कोहोलिक बेव्हरेजेस एनर्जी ड्रिंक्स महागणार आहेत. त्याचबरोबर कॅफिनेटेड ड्रिंक्स म्हणजेच ज्यामध्ये कॅफीन असतं अशी पेयं देखील महागणार आहेत. ज्या वस्तूंमध्ये अतिरिक्त साखर किंवा फ्लेवर किंवा स्वीटनर मिसळलेला असतो ते सर्व पदार्थ हे आता ४० टक्के जीएसटीच्या श्रेणीत येणार आहेत.
महागड्या गाड्या
ज्या चारचाकी गांड्याची इंजीन कपॅसिटी १२०० सीसीच्या पुढे आहे आणि ज्या गांड्यांची लांबी ४ मीटरपेक्षा जास्त आहे त्या गाड्या देखील ४० टक्के जीएसटीच्या कक्षेत येणार आहेत. तसंच ३५० सीसी च्या पुढच्या दुचाकींवर देखील ४० टक्के जीएसटी लागणार आहे. यॉट, वैयक्तीक वापरासाठीची विमानं, रेसिंग कार यांना देखील ४० टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे.
तंबाखू
तंबाखू आणि त्याच्या संबंधीत उत्पादनांवर देखील ४० टक्के जीएसटी लागणार आहे. त्यामुळं सिगारेट देखील महागणार आहे.
रेस क्लब, आयपीएल तिकीट
नव्या ४० टक्के स्लॅबमध्ये रेसिंग क्लब, लीज किंवा रेंटल सर्विसेस आणि कसिनो, गॅम्बलिंग, हॉर्स रेसिंग, लॉटरी, ऑनलाईन मनी गेमिंग, आयपीएल तिकीट यांच्यावर देखील आता ४० टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे.